काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर काही दिवसांपूर्वी मोठे फेरबदल केले होते. देशातील ६ राज्यांचे प्रभारी काँग्रेसने बदलले होते. आसाम, पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यात काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर आता काँग्रेस हायकमांडने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

यूपी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आराधना मिश्रा

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेतृत्वाची धुरा आता आराधना मिश्रा मोना यांच्याकडे सोपवली आहे, म्हणजे उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आराधना मिश्रा मोना यांची नियुक्ती केली, तर इम्रान मसूद यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने पंजाबसाठी आपल्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची देखील घोषणा केली आहे. या संदर्भातील माहिती काँग्रेसने निवेदन जारी करत दिली आहे.

परगट सिंग पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी

परगट सिंग यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता परगट सिंग यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे फेरबदल केले आहेत.

परगट सिंग कोण आहेत?

पंजाबमधील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परगट सिंग यांच्यावर काँग्रेस हायकमांडने मोठी जबाबदारी सोपवली आहे. परगट सिंग हे भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आहेत. तसेच त्यांनी पंजाबमध्ये शिक्षण आणि क्रीडा मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे. सध्या ते आमदार देखील आहेत.

आराधना मिश्रा कोण आहेत?

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आराधना मिश्रा मोना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आराधना मिश्रा मोना या सध्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून कार्यरत आहेत. त्या सध्या प्रतापगडमधील रामपूर खास मतदारसंघाच्या आमदार आहेत. आराधना मिश्रा या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांच्या कन्या आहेत.

प्रमोद तिवारी हे विद्यमान राज्यसभा खासदार आणि पक्षातील एक प्रमुख नेते आहेत. आराधना मिश्रा या रामपूर खास मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी २०१४ च्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला आणि त्यानंतर २०१७ व २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.