पीटीआय, नवी दिल्ली
केंद्र सरकारने काश्मीर प्रश्नावर अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का असा प्रश्न प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने रविवारी विचारला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रविरामाची घोषणा केल्यामुळे काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण केल्याचा प्रयत्न केल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दोन्ही देशांदरम्यान शस्त्रविरामाची घोषणा आश्चर्यकारक होती, कारण पहिल्यांदाच भारत व पाकिस्तानच्या वतीने तिसऱ्या देशाने घोषणा केली असे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट पत्रकार परिषदेत म्हणाले. दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक घेण्याची आणि संसदेच्या विशेष अधिवेशनाची विरोधी पक्षांची मागणी सरकारने मान्य केली पाहिजे असे पायलट म्हणाले.

विशेष अधिवेशनाची मागणी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सीमेपलिकडून होणारा गोळीबार व तोफांचे हल्ले या मुद्द्यांवर चर्चा केली जावी अशी मागणी राहुल आणि खरगे यांनी केली आहे.

‘धडा शिकवण्याची संधी असताना शस्त्रविराम का?’

मुंबई : भारताकडे पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना शस्त्रविराम का करण्यात आला असा सवाल विरोधक करत आहेत. ट्रम्प यांच्या सांगण्यावरून शस्त्रविराम स्वीकारण्यात आल्यामुळे जगात भारताची बेअब्रू झाली, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

‘‘भारत हे सार्वभौम, स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण झाल्याशिवाय शस्त्रविराम कशासाठी ट्रम्प कोणत्या अधिकारात मध्यस्थी करतात,’’ असा सवाल संजय राऊत यांनी केला. ‘पाकिस्तानके तुकडे करेंगे’, अशी भाषा पंतप्रधान मोदींची होती. मग ते तुकडे कुठे गेले असा प्रश्नही त्यांनी विचारला.

रशिया-युक्रेन युद्धावेळी भाजपने ‘पापा ने वॉर रुकवा दी’ असे जाहीर केले होते. मग आता अमेरिकेच्या पापाने भारताचे युद्ध थांबवले का?

संजय राऊत, खासदार, शिवसेना (उद्धव ठाकरे)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबेडकर यांची टीका

अमेरिकेच्या अध्यक्षांकडून शस्त्रविराआविषयी आपण प्रथम का ऐकले, पंतप्रधान कार्यालय, पराष्ट्र मंत्रालयाकडून का नाही? अमेरिकेचे ऐकून शस्त्रविराम का मान्य केला, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.