कन्नडींगा मतदारांनी कॉंग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकल्यानंतर आता पक्षाने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू केला आहे. राज्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी ‘कांटे की टक्कर’ असल्याचे चित्र आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे चार निरीक्षक बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यामध्ये संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी, मधुसूदन मिस्त्री, लुईझिनो फालेरो आणि जितेंद्र सिंग यांचा समावेश आहे. हे नेते कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची भेट घेणार आहेत. पक्षाच्या कार्यालयामध्ये होणाऱया बैठकीमध्ये आमदारांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल.
मुख्यमंत्रीपदासाठी जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सिद्धरामय्या आणि खर्गे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा मिळवण्यासाठीच ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.