Amit Shah on EVM Machine: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत सुधारणा आणण्यासाठी लोकसभेत झालेल्या चर्चेत विविध मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केले. एसआयआर, निवडणूक आयोगावरही त्यांनी टीका केली. या चर्चेला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या टीकेला उत्तर देताना म्हटले की, काँग्रेसनेच ईव्हीएम मशीन पहिल्यांदा आणली आणि याचा त्यांनीच फायदा घेतला होता.

लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, २०१४ पासून काँग्रेसच्या पराभवाची मालिका सुरू झाली. तेव्हापासून त्यांनी ईव्हीएमला दोष देण्यास सुरुवात केली. मी देशाला सांगू इच्छितो की, १५ मार्च १९८९ साली जेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा ईव्हीएम आणण्यासाठी कायदा करण्यात आला. आता काँग्रेसचे नेते राजीव गांधींनी केलेल्या कायद्याचाच विरोध करत आहेत.

ईव्हीएच्या वापराबाबत कुणीतरी सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने २००२ साली ईव्हीएम वापराच्या या कायद्याला योग्य ठरवले. १९९८ साली मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीच्या १६ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनची ट्रायल घेण्यात आली होती, अशीही माहिती अमित शाह यांनी दिली.

२००४ साली ईव्हीएममुळे काँग्रेस सत्तेत?

अमित शाह पुढे म्हणाले, “२००४ साली लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात ईव्हीएमचा वापर करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता. २००९ सालीही ईव्हीएमचा वापर झाला. त्याही निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. त्यावेळी ईव्हीएमवर यांना बिलकुल संशय येत नव्हता. २०१४ साली आम्ही जिंकलो आणि यांची कावकाव सुरू झाली. कायदा तुम्हीच आणला, मशीनही तुम्हीच आणली, दोन वेळा सत्ताही मिळवली आणि आता तुम्हीच ईव्हीएमच्या विरोधात बोंबलत आहात.”