राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा भारताचा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे. देशातील विभाजनकारी शक्तींचा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या या यात्रेवर भाजपाकडून सडकून टीका करण्यात येत आहे. या दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धात भाजपाची काहीच भूमिका नाही, असे सांगतानाच त्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला आहे.

‘भारत जोडो यात्रा’ म्हणजे कुटुंब वाचवण्याची मोहीम; भाजपची टीका

“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी ‘करा किंवा मरा’ असा नारा दिला होता. काँग्रेसच्या यात्रेवर टीका करणाऱ्या लोकांचा या लढ्यात सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातदेखील या लोकांची काहीच भूमिका नाही”, असे चिदंबरम म्हणाले आहेत. भारत एकसंध राहू नये, असे वाटत असल्यानेच भाजपाकडून या यात्रेवर टीका केली जात असल्याचा निशाणा चिंदबरम यांनी साधला आहे.

मोठी बातमी! दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई

तामिळनाडूच्या कन्याकुमारीतून काँग्रेसच्या या यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. आज या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सुचिंन्द्रम येथील एका शाळेला भेट दिली. या यात्रेचा पुढील मुक्काम ११ सप्टेंबरला केरळमध्ये असणार आहे. केरळमध्ये १८ दिवसांच्या मुक्कामानंतर ही यात्रा कर्नाटकच्या दिशेने कूच करणार आहे. ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यात्रेची सांगता जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे.