काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे. “आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असा मोठा दावा काँग्रेसने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने म्हटलं, “मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे.”

“सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर”

“भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर येत आहे,” असा दावा काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा : “रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे का? ओडिशा दुर्घटनेप्रकरणी मल्लिकार्जुन खरगेंचे मोदींना पत्र, म्हणाले, “सुरक्षेचे पोकळ दावे…”

“विद्यमान ६० टक्के आमदारांचं तिकीट कापावं”

“हा सर्व्हे समोर आल्यानंतर मध्य प्रदेश भाजपात खळबळ उडाली आहे. तसेच विद्यमान ६० टक्के आमदारांचं तिकीट कापावं अशी सुचनाही येत आहे,” असाही दावा काँग्रेसने केला.

काँग्रेसच्या दाव्यानुसार ६ सर्व्हे कोणते?

१. जानेवारी २०२३

सोशल मीडियावर संघाचा एक सर्व्हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात भाजपाला १०३ जागा मिळून सत्तेबाहेर जावं लागत आहे.

२. फेब्रुवारी २०२३

काँग्रेसचा एक अधिकृत सर्व्हे समोर आला. यात भाजपाला केवळ ९५ जागा मिळत आहेत.

३. मार्च २०२३

गुप्तचर विभागाचा एक गुप्त सर्व्हे लिक झाला. त्यात भाजपाला ८० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहे.

४. एप्रिल २०२३

दैनिक भास्कर आणि ईएमएससह इतर अनेक वृत्तसमुहांचे सर्व्हे प्रशासनात व्हायरल झाले आहेत. यात भाजपाला केवळ ७० जागा मिळत आहेत.

५. मे २०२३

ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक सर्व्हे झाला त्यात भाजपाला केवळ ६५ जागा मिळताना दिसत आहे.

६. जून २०२३

नवभारत समाचारने एक सर्व्हे प्रकाशित केला. यात भाजपा सतेतेबाहेर जात असून केवळ ५५ जागा मिळत असल्याचं सांगण्यात आलं.

हेही वाचा : मोदींचा ‘तो’ VIDEO ट्वीट करत काँग्रेसचा हल्लाबोल, जाहिरातीवरील खर्चाचा आकडा सांगत म्हणाले…

“वरील सर्व सर्व्हेंमध्ये काँग्रेसच्या जागा वाढत असल्याचं आणि काँग्रेस जनतेचा आवाज म्हणून पुढे येत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे भाजपाची स्थिती वाईट होत आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, यावेळी भाजपा ५० पेक्षा कमी जागांवर निवडून येईल,” असंही काँग्रेसने नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress big claim about madhya pradesh assembly election survey rss bjp pbs
First published on: 06-06-2023 at 08:14 IST