New Parliament Building Inauguration by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन झालं. विधिवत ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात भारताचा विकास आणि अमृतकाल यासंदर्भात गौरवपूर्ण उल्लेख केले. या उद्घाटन सोहळ्यानंतर आता त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे विरोधकांकडून संसदेच्या उद्घाटनासाठी पूजाविधी केल्याचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारने विज्ञानाची कास सोडल्याची टीका केली जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं, अशा प्रकारची टीका केली जात आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
नव्या संसद भवनाचं उद्घाटन झाल्यानंतर विरोधकांकडून मोदींची प्रतिमा उंचावण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्वीट केलं. यात ‘कितनी बी कोशिश कर लो’, असं लिहून त्यासोबत एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
“घ्या.. याचसाठी आपण यांना निवडून दिलं होतं”, स्वरा भास्करनं मोदींचा संसदेतला ‘तो’ फोटो केला ट्वीट!
काय आहे फोटोमध्ये?
काँग्रेसनं ट्वीटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो आहे. नेहरु उभे असून समोर पाहात असल्याचं या फोटोत दिसत आहे. त्यांच्या बाजूलाच अत्यंत लहान आकृतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जवाहरलाल नेहरुंची उंची कधीही गाठता येणार नाही, अशा आशयाचा संदेश काँग्रेसला द्यायचा असल्याचं म्हटलं जात आहे.
भाजपाचं प्रत्युत्तर!
दरम्यान, काँग्रेसच्या या ट्वीटला भाजपान जवाहरलाल नेहरूंचा तोच फोटो घेऊन खोचक टोला लगावला आहे. “नेहरू का सच” असं ट्वीट करत भारतीय जनता पक्षानं नेहरूंचा तोच फोटो घेतला आहे. त्यामध्ये ‘Reel’ आणि ‘Real’ असं लिहिण्यात आलं आहे. एकीकडे जवाहरलाल नेहरूंचा मोठ्या आकारातला फोटो असून दुसऱ्या बाजूच्या कॅमेऱ्याखाली नेहरूंचा छोट्या आकारातला फोटो दिसत आहे.
त्यामुळे एकीकडे प्रत्यक्ष वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देताना एकमेकांवर टीटा-टिप्पणी करणारे हे दोन्ही पक्ष सोशल मीडियावरही एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress bjp tweets pt jawaharlal nehru and narendra modi photo pmw