नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सहाव्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली असून दिल्लीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये उच्चांकी ६२.८९ टक्के मतदान झाले आहे. अन्य सहा मतदारसंघांमध्ये मतटक्क्याने साठीदेखील पार केलेली नाही. उत्तर-पूर्वमध्ये झालेल्या भरघोस मतदानामुळे या जागेसाठी कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

उत्तर-पूर्व मतदारसंघामधील सीलमनगर, मुस्तफाबाद हे मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघ आहेत तर, सीमापुरी, गोकुलपूर हे अनुसूचित जातींसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहेत. या भागांतील मुस्लीम व दलित मतदारांनी काँग्रेस व ‘आप’च्या ‘इंडिया’ आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे मानले जात आहे. ‘इंडिया’ आघाडीसाठी कार्यरत असलेल्या नागरी संघटनांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दिल्लीत इतर मतदारसंघांपेक्षा उत्तर-पूर्वमध्ये मतटक्क्याने उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा >>> दिवाळखोर रेडियस इस्टेट अवघ्या ७६ कोटींत ‘अदानी’कडे ; ‘एनसीएलएटी’च्या निवाड्याने बँकांची ९६ टक्के थकीत देणी पाण्यात

२०१९ मध्ये उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये ६३.८१ टक्के मतदान झाले होते. पण, पाच वर्षांपूर्वी दिल्लीतील एकूण चार मतदारसंघांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. यावेळी फक्त उत्तर-पूर्व मतदारसंघामध्येच ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने भाजपला मते दिली गेली होती. चांदनी चौक, पूर्व दिल्ली व पश्चिम दिल्ली या मतदारसंघांमध्येही मतटक्क्यांनी साठीपार केली होती. यावेळी इथे मतटक्का पन्नाशीत राहिला आहे.

दिल्लीमध्ये गेल्या शनिवारी झालेल्या मतदानामध्ये चांदनी चौक मतदारसंघात ५८.६० टक्के, पूर्व दिल्ली ५९.५१ टक्के, उत्तर-पश्चिम दिल्लीमध्ये ५७.८५ टक्के, दक्षिण दिल्लीमध्ये ५६.४५ टक्के व पश्चिम दिल्लीमध्ये ५८.७९ टक्के मतदान झाले आहे. या तुलनेत उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये जास्त मतदान झाले असून त्याचा फायदा भाजपचे विद्यामान खासदार मनोज तिवारी की, कन्हैय्या कुमार यांना मिळणार याकडे लक्ष वेधले गेले आहे.