नंदिग्राम विधानसभेचे काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना अटक करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही तासांतच प्रधान यांना अटक झालीय. जुन्या कथित खून प्रकरणात त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. नंदिग्राम विधानसभेची पोटनिवडणूक ६ ऑक्टोबर रोजी होणार असून, यासाठी ममतांच्या गटाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.

२००७ मधील ते आंदोलन

२००७ मध्ये नंदिग्राम येथे भूसंपादन विरोधी आंदोलनादरम्यान एका खून प्रकरणात प्रधान यांना अटक करण्यात आली होती. नंदिग्राममधील हे आंदोलन ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाचे आंदोलन मानले जाते. याच आंदोलनामुळे तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगाल तत्कालिन सरकारविरोधात चित्र निर्माण करण्यात यश आले होते. अखेरी २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेवर आली. तृणमूल काँग्रेसने देखील १५ वर्षे राज्य केल्यानंतर २०२६ मध्ये भाजपाने ममतांच्या सत्तेला सुरुंग लावला.

उमेदवाराने माघार घेतल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा

ममता बॅनर्जी यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन नंदिग्राम विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारला पाठिंबा जाहीर केला. ममतांच्या गटाकडून संचिता प्रधान दे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, संचिता यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर ऐनवेळी माघार घेतल्याने ममतांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस भगिनी तुल्य पक्ष असल्याचे म्हणत ममतांनी पाठिंबा देण्याचा निर्णय इंडिया आघाडी बळकट करण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही नंदिग्राममध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय, हा भविष्याचा उदय आहे. आता बंगालमधूनच संदेश जाऊद्यात”, असे ममता बॅनर्जी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

काँग्रेसने काय प्रतिक्रिया दिली?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ममतांकडे पाठिंब्याची मागणी केली नसल्याचे सांगताना, “त्या घोषणा करण्यास स्वतंत्र आहेत”, असे स्पष्ट केले. त्या राजकीय नेत्या आहेत. त्यांना हवं ते बोलू शकतात. पण, सत्य हे आहे की त्यांच्या उमेदवाराने माघार घेतलीय आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. आम्ही पाठिंब्याची मागणी केलेली नाही, असे चौधरी म्हणाले.

नवे नाव, नवे चिन्ह

दुसरीकडे ममता बॅनर्जी आणि फुटीर गटाला तृणमूल काँग्रेस हे नाव आणि पक्षाचे चिन्ह न वापरण्याचे आदेश दिलेत. या बदल्यात दोन्ही गटांना नवे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे. ०६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांना ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर अरुप रॉय यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाला ‘डेमॉक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आले आहे.