नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष नॅशनल हेराल्डचे प्रकाशन करणाऱ्या ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ची (एजेएल) विक्री करण्याचा नव्हे तर त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत होता असा युक्तिवाद राहुल गांधी यांचे वकील आर एस चीमा यांनी शनिवारी विशेष न्यायालयासमोर केला.
काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत मोतीलाल व्होरा, दिवंगत ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा या सर्वांनी, तसेच यंग इंडियन या खासगी कंपनीने ‘एजेएल’ची दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान काँग्रेस नेते जवाहारलाल नेहरू, जे बी कृपलानी, रफी अहमद किडवाई आणि इतरांनी १९२७मध्ये ‘एजेएल’ची स्थापना केली होती. ‘एजेएल’च्या ‘मेमोरँडम ऑफ असोसिएशन’नुसार, काँग्रेसचे धोरण हेच ‘एजेएल’चे धोरण असणार होते असे चीमा यांनी विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांना सांगितले. तसेच ‘ईडी’ ही बाब का लपवत आहे असा प्रश्नही त्यांनी विचारला.