Premium

मोदींचा ‘तो’ VIDEO ट्वीट करत काँग्रेसचा हल्लाबोल, जाहिरातीवरील खर्चाचा आकडा सांगत म्हणाले…

मोदी १८ तास काम करत असतील तर त्यांना जाहिरातीवर इतके पैसे खर्च करण्याची गरज काय? असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.

PM Narendra Modi Rahul Gandhi
राहुल गांधी व नरेंद्र मोदी

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी मोदी सरकारने तब्बल २३०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला आहे. तसेच मोदी १८ तास काम करत असतील तर त्यांना जाहिरातीवर इतके पैसे खर्च करण्याची गरज काय? असा सवाल विचारला आहे. काँग्रेसने एक व्हिडीओ ट्वीट केला. यावेळी कॅप्शनमध्ये लिहिलं, “२३ अब्ज (२३०० कोटी) रुपये, पुन्हा एकदा वाचा पंतप्रधान मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी वर्तमानपत्रातील जाहिरातींवर २३ अब्ज रुपये खर्च करण्यात आले.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ आहे. यात मोदी म्हणत आहेत, “सत्तेत आलेला राजकीय पक्ष करदात्यांच्या पैशांचा वापर आपल्या पक्षाच्या हितासाठी करत आहे की देशाच्या हितासाठी करत आहे हे जनतेला पाहावं लागणार आहे.” यानंतर व्हिडीओत अन्य एका ठिकाणी अमित शाह म्हणत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ तासांपैकी १८ तास काम करतात.

“मोदींनी स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी करदात्यांचा पैसा पाण्यासारखा खर्च केला”

काँग्रेसने या व्हिडीओत म्हटलं, “मोदी बोलतात एक आणि वागतात वेगळेच. पंतप्रधान मोदींनी स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी करदात्यांचा पैसा पाण्यासारखा खर्च केला. सत्तेत आल्यानंतर केवळ ७ वर्षात मोदी सरकारने लोकांच्या मेहनतीच्या कमाईतील २३०० कोटी रुपये (२३ अब्ज) स्वतःच्या जाहिरातीवर खर्च केले.”

“मोदींना हिरो दाखवण्यासाठी दिवसाला ९० लाख, तर तासाला ३ लाख ७५ हजार रुपये खर्च”

“स्वतःला गरिबांचं सरकार म्हणणाऱ्या मोदी सरकारने २३०० कोटी रुपये स्वतःचा चेहरा चमकवण्यासाठी खर्च केले. म्हणजेच मोदी सरकारने दररोज ९० लाख, दर तासाला ३ लाख ७५ हजार रुपये केवळ मोदींना हिरो दाखवण्यासाठी खर्च केले. हा आकडा केवळ छापिल वर्तमानपत्रांचा आहे. उर्वरित माध्यमांमधील खर्च यापेक्षा कितीतरी अधिक आहे,” असाही दावा काँग्रेसने केला.

“८ तास काम केलं असतं, तर जाहिरातीची वेळ आली नसती”

काँग्रेसने पुढे म्हटलं, “वर्तमानपत्राशिवाय रेडिओ, सोशल मीडिया, टेलिव्हिजन, बॅनरबाजी यावर किती पैसे खर्च झाले असतील याचा विचार करा. मोदींनी १८ तास काम केलं असतं, तर मोदींवर जाहिरात देण्याची वेळ आली नसती. मोदींनी २३०० कोटी रुपये त्यांची खोटी प्रतिमा निर्माण करण्यावर खर्च केले.”

हेही वाचा : VIDEO: पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील निती आयोगाच्या बैठकीला १० मुख्यमंत्री गैरहजर, एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांच्या…”

“२३०० कोटी रुपयांमध्ये दोन वर्षे १० लाख मुलांचं पोट भरलं असतं”

“या जाहिरातीवर खर्च केलेल्या २३०० कोटी रुपयांमध्ये दोन वर्षे १० लाख मुलांचं पोट भरलं असतं. ४ नवे एम्स आणि ४ नवे आयआयटी निर्माण झाले असते. हजारो किलोमीटर रस्ते निर्माण झाले असते. मात्र, मोदींना स्वतःप्रतिच्या मोहापुढे शाळा, रुग्णालये महत्त्वाची वाटली नाहीत. सरकारची इच्छा असती, तर या पैशांचा वापर सामान्य नागरिकांसाठी केला असता. मात्र, सरकारने तसं केलं नाही. कारण त्यांच्यासाठी सर्वांची साथ आणि स्वतःचा विकासच महत्त्वाचा आहे,” असंही काँग्रेसने म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress criticize pm narendra modi government for advertisement pbs

First published on: 02-06-2023 at 22:23 IST
Next Story
VIDEO : ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात, ५० जणांचा मृत्यू, ३५० जण गंभीर जखमी