देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांपासून नवा वाढत आहे. करोना संकटात होत असलेल्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून काँग्रेसनं पुन्हा एकदा मोदींना निशाणा बनवले आहे. “नरेंद्र मोदी हे पेट्रोल डिझेलच्या किंमतीपेक्षा कमी वय असणारे पहिले पंतप्रधान बनले आहे”, असा उपहासात्मक टोला काँग्रेसनं लगावला आहे.

देशात करोनाचं संकट अजून थांबलेलं नाही. करोनाचा सामना करत असताना सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीलाही तोंड द्यावं लागत आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून दररोज टीका केली जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलवाढ परत घ्यावी, अशी मागणीही पंतप्रधानांकडे केली होती. तसेच आज काँग्रेसनं सरकारविरोधात ठिकाणी आंदोलन केलं.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. वल्लभ यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून एक ट्विट करून पंतप्रधान मोदींना चिमटा काढला आहे. “आणखी एक कामगिरी. मोदीजी देशाचे पहिले असे पंतप्रधान बनले आहेत, ज्यांचं वय हे प्रति लिटर पेट्रोल, प्रति लिटर डिझेल व प्रति डॉलरच्या तुलनेत रुपया या तिन्हीच्या किंमतीपेक्षा कमी आहे”, अशी टोला वल्लभ यांनी लगावला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात किती झाली वाढ?

सोमवारी (२९ जून) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून, पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैसे झाला. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.