न खाऊंगा न खाने दुंगा हा पंतप्रधानांचा नारा नाही. तर ‘खाऊंगा, खाने दुंगा और पॅक करके ले जाने दुंगा’ हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

बँकांचे कर्ज बुडवून उद्योजक जतिन मेहता आणि त्याची पत्नी देशाबाहेर पळाले. त्या दोघांनी देशाचे नागरिकत्त्वही सोडले. त्यानंतर नीरव मोदी आणि त्याची पत्नी तसेच त्याचा मामा मेहुल चोक्सी हेदेखील पीएनबीला ११ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावून देशाबाहेर पळाले. हे सगळे प्रकार लक्षात घेतले तर ‘खाऊंगा, खाने दुंगा, पॅक करके ले जाने दुंगा’ हाच या पक्षाचा नारा असल्याचे दिसते आहे अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

विजय मल्ल्या, जतिन मेहता आणि आता नीरव मोदी हे सगळे बँकांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळाले. यांना काय शिक्षा होणार? त्यांचे प्रत्यार्पण कधी केले जाणार? या प्रश्नांची उत्तरे देशाला हवी आहेत. एकाही घोटाळेबाजाला सोडणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली हे छातीठोकपणे सांगत असतात. मात्र एकाही कर्जबुडव्यावर कारवाई झालेली नाही असेही सुरजेवालांनी म्हटले आहे. नीरव मोदी देशाबाहेर पळण्यामागे भाजपाचा हात आहे असा आरोप काँग्रेसने याआधीच केला होता. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा नीरव मोदीला झाला असा आरोप राहुल गांधी यांनीही केला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.