लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काँग्रेसने मंगळवारी ‘मतचोरी’विरोधातील संघर्ष अधिक तीव्र केला. काँग्रेसच्या मंगळवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ज्ञानेश कुमार तसेच, केंद्र सरकारविरोधातील रणनीती निश्चित करण्यात आली.
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचीही बुधवारी दिल्लीत बैठक होणार असून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
काँग्रेसने तिघांच्या राजीनाम्यासह मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम तातडीने स्थगित करण्याचा ठरावही संमत केला. आला. ‘एसआयआर’मधील ‘फॉर्म ६’मध्ये अनधिकृत बदल केल्याचा आरोपही ठरावात करण्यात आला आहे. ‘फॉर्म ६’द्वारे नव्या मतदारांची नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट केली जातात. या फॉर्ममध्ये नवमतदारांना आई-वडील, आजी-आजोबांच्या संदर्भातील माहिती देणे अप्रत्यक्षपणे सक्तीचे करण्यात आले होते. या कथित सक्तीला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे.
‘एसआयआर’च्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह
‘एसआयआर’ह्णच्या घटनात्मक वैधतेवरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला. मतदारांवर पात्रता सिद्ध करण्याची जबाबदारी टाकून मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. ‘एसआयआर’ प्रक्रियेतून १३ कोटी ३० लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा ठरावात करण्यात आला असून, ही सर्व नावे तातडीने पुनस्र्थापित केली जावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमारांचा कारभार मनमानी असून इतर निवडणूक आयुक्तांशी पुरेशी सल्लामसलत न करताच निर्णय घेतले जातात, अशी टीका ठरावात करण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी १४ आक्षेप नोंदवल्याचा उल्लेखही काँग्रेसने केला आहे.
आता आरपारची लढाई
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दीड वर्षापासून ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित करत आहेत. बिहारमधील ‘व्होटर अधिकार यात्रा’, कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणातील मतदार यादीतील कथित फेरफारांबाबत पत्रकार परिषदा, निवडणूक आयोगाकडे केलेल्या हरकती तसेच, एसआयआरविरोधातील कायदेशीर लढा आदीचा उल्लेखही ठरावात करण्यात आला आहे. काँग्रेस केवळ विरोधी पक्ष नाही, तर प्रतिकार करणारा पक्ष आहे, असे नमूद करत, आता आरपारची लढाई करण्याचा निर्धार ठरावात व्यक्त करण्यात आला आहे.
भायखळ्याहून मुंबई महापालिकेपर्यंत मोर्चा
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संयुक्त मोर्चा ४ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. हा मोर्चा भायखळा येथून सकाळी १० वाजता निघणार असून मुंबई महापालिका परिसरात या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. तिरंगा घेऊन सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘मग, तुम्ही कर्नाटकात कसे जिंकलात?’
निवडणूक आयोगासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या आरोपाला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले. कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस जिंकला, तेव्हा निवडणूक आयोगाची कार्यपद्धती योग्य नव्हती का, असा सवाल इराणी यांनी केला. मृत आणि दुबार मतदारांची नावे मतदारयादीतून वगळून मतदारयाद्यांचे शुद्धीकरण केले गेले. या प्रक्रियेला काँग्रेस कशासाठी विरोध करत आहे, असा मुद्दाही इराणी यांनी उपस्थित केला.
