पीटीआय, नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसने शनिवारी भावपूर्ण आदरांजली वाहिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, की, देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंचा वारसा एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या शिकवणीच्या प्रकाशात भारतीयत्वाची भावना, लोकशाही, स्वातंत्र्याची मूल्ये आजही उजळून निघत आहेत. दिल्लीतील शांतिवन या नेहरूंच्या स्मृतिस्थळावर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह भेट दिली. त्यांनी नेहरूंच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.
खरगे यांनी हिंदीत ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाविना २१ व्या शतकातील भारताची कल्पना करता येणे अशक्य आहे. लोकशाहीचे निर्भय रक्षक असलेल्या नेहरूंनी अनेक आव्हानांवर मात करून, पुरोगामी आचरणाने भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाला जोरदार चालना दिली.




मोदींकडून आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिली. भारताचे पहिले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलेल्या नेहरूंचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले. मी आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहतो, असे ‘ट्वीट’ मोदींनी केले आहे.