उमेदवारांकडून लाचप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार
पीटीआय, बंगळुरू
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जामधील त्रुटी शोधाव्यात आणि भाजपच्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्जातील चुका सुधाराव्यात, यासाठी विविध जिल्ह्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यालयातून (सीएमओ) दूरध्वनी केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला.




निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करून तपासासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील दूरध्वनींचा तपशील मागवावा, अशी मागणी कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांनी सौंदत्ती येल्लम्मा मतदारसंघाचे उदाहरण देत सांगितले, की काही भाजप उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून थेट संबंधित अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारांना ‘बी फॉर्म’ देताना लाच मागितल्याचा आरोप केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केला. निवडणूक आयोगाने शिवकुमार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करून आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. करंदलाजे या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीच्या निमंत्रक आहेत.
शिवकुमार यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले, की आपला पक्ष भाजपप्रमाणे ४० टक्के दलाली घेत नाही. आम्ही फक्त पक्षासाठी निधी गोळा करत आहोत. आम्ही सर्वसाधारण उमेदवारांकडून दोन लाख रुपये आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांकडून एक लाख रुपये घेत आहोत.मतदारांना चांदीचे दिवे, मंत्र्यावर गुन्हा बिलगी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून रिंगणात असलेले मंत्री मुरुगेश निरानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१.४५ लाख रुपयांचे ९६३ चांदीचे दिवे जप्त करण्यात आले आहेत. मतदारांना लाच देण्याचा हा प्रकार असल्याचा ठपका निरानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उद्योग मंत्रालयाचा कारभार सांभाळत असलेल्या निरानी यांच्याविरोधात मुधोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.