Congress Demand CJI Surya Kant Resignation: “राजधानी दिल्लीत सुरू असणारी आंदोलने हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असून, तो माझ्या अखत्यारीत येत नाही”, असे वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले असल्याची पोस्ट पीटीआयने केली असल्याचा स्क्रिनशॉट काँग्रेसकडून शेअर करण्यात आला होता. या विधानावरून आता राजकीय वाद पेटला असून काँग्रेसने सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजपाने काँग्रेसवर न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा आरोप करत तीव्र शब्दांत पलटवार केला आहे.
काँग्रेसच्या केरळ प्रदेश शाखेने सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “सरन्यायाधीश महोदय, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे तुमच्या अखत्यारीत येत नसेल, तर तात्काळ राजीनामा द्या. ही जबाबदारी सांभाळू शकेल असा योग्य पर्याय आम्ही शोधून काढू,” असे केरळ काँग्रेसने पोस्टमध्ये लिहिले.
मात्र वाद वाढताच केरळ काँग्रेसने सदर पोस्ट डिलीट केली आहे. याबद्दल अद्याप काँग्रेसकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही. मात्र भाजपाने यावरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

भाजपाचा पलटवार
काँग्रेसच्या या वक्तव्यावर भाजपाच्या केरळ शाखेने आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसला आणीबाणीच्या काळाची आठवण करून देत भाजपाने म्हटले, “देशात अजूनही तुमच्या ‘आयर्न लेडी’चेच राज्य सुरू आहे असा गैरसमज करून घेऊ नका. आणीबाणीच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने न्यायव्यवस्थेवर दबाव आणत होतात, ते दिवस आता उरलेले नाहीत.” तसेच “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा नवा भारत आहे; त्यामुळे तोंड बंद ठेवा,” असा टोलाही भाजपाने लगावला.
सरन्यायाधीश सूर्यकांत काय म्हणाले होते?
नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा’च्या ३३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हे भाष्य केले होते. राजधानीतील आंदोलने आणि निर्बंधांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असून तो माझ्या अखत्यारीत येत नाही.”
याशिवाय मतदार यादीतील फेरफार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी भेटीसाठी मागितलेल्या वेळेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कोणताही नागरिक किंवा लोकप्रतिनिधी याचिकेद्वारे न्यायालयात दाद मागू शकतो,” असे ते म्हणाले. विरोधकांचे पत्र मिळाले असून त्यांना लेखी उत्तर पाठवण्यात आल्याचे सांगत, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने स्वतंत्र भेट घेणे औचित्याला धरून ठरणार नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी केरळ काँग्रेसने विधानसभेत ठराव मंजूर केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री वी. डी. सतिशन यांच्यामार्फत विधासनभेत हा प्रस्ताव सादर करण्यात आला.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करण्याबरोबरच विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात, मतदार यादीतून नाव वगळण्यात आलेल्या सर्व पात्र मतदारांचे मतदानाचे हक्क पुन्हा बहाल करण्यात यावेत आणि निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीची पुनर्रचना करण्यात यावी, या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश केला जावा, अशा तीन मागण्याही करण्यात आल्या आहेत.
