नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. मणिपूरमध्ये तातडीने शांतता निर्माण करण्यासाठी काँग्रेसने १२ मागण्यांचे पत्र देऊन मुर्मू यांना हस्तक्षेपाची विनंती केली.
मणिपूरमधील कुकी व मेईती जमातींमधील वाद विकोपाला गेला असून हिंसक घटना थांबवण्यात बीरेन सिंह यांचे भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संघ व भाजपचे विभाजनवादी राजकारण या हिंसाचाराला कारणीभूत आहे. त्यांच्या फुटीच्या राजकारणामुळे सध्या मणिपूरमध्ये हिंसेचा वणवा पेटला आहे. मणिपूरमध्ये २२ वर्षांपूर्वी केंद्रात भाजपची सत्ता असताना हिंसाचार झाला होता. यावेळी तर परिस्थिती वाईटाकडून अतिवाईटाकडे गेली आहे, असे टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.