scorecardresearch

गुजरातच्या दंगलीसाठी मोदींनी माफी मागण्याचा मुद्दा कालबाह्य- भाजप

भारताच्या ‘रॉ’ (रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग) या गुप्तहेर संस्थेचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांच्या वकव्यानंतर गुजरात दंगलींसाठी मोदींनी माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपने शुक्रवारी फेटाळून लावली.

गुजरातच्या दंगलीसाठी मोदींनी माफी मागण्याचा मुद्दा कालबाह्य- भाजप

भारताच्या ‘रॉ’ (रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग) या गुप्तहेर संस्थेचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांच्या विधानाचा आधार घेत  गुजरातच्या दंगलीसाठी मोदींनी माफी मागावी, ही काँग्रेसने केलेली मागणी भाजपने शुक्रवारी फेटाळून लावली. सध्याचा काळात हा मुद्दा संपूर्णपणे असंबद्ध आहे. केवळ राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसकडून अशाप्रकारचे मुद्दे उपस्थित करण्यात येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. या सगळ्यासाठी काँग्रेसने पंतप्रधानांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही यावेळी भाजपने केली.
ए.एस. दुलत यांनी लिहलेल्या ‘काश्मीर- द वाजपेयी इयर्स’ या पुस्तकातील मजकूर शुक्रवारी उघड झाल्यानंतर या सगळ्या वादाला सुरूवात झाली होती. दुलत यांनी आपल्या पुस्तकात वाजपेयी सरकारच्या काळात घडलेल्या अनेक घटनांसंदर्भात भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी गुजरात दंगलींचा उल्लेख करत नरेंद्र मोदींनी अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दाचा मान ठेवत आता तरी देशाची माफी मागावी, असे विधान केले होते. याच विधानाचा धागा पकडत काँग्रेसने मोदींनी देशातील जनतेची माफी मागावी, ही मागणी उचलून धरली होती. मात्र, गुजरात दंगलप्रकरणात मोदींना याअगोदरच न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. याप्रकरणात बोलण्यासाठी काहीच उरले नसताना आता काँग्रेसकडून अकारण हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. काळाच्या ओघात हा मुद्दा संपूर्णपणे असंबद्ध ठरला आहे. काँग्रेसने त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात प्रशासन, न्यायालय प्रत्येक स्तरावर प्रयत्न करून पाहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरात दंगलींशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. तरीही काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेसने त्यांची माफी मागावी , अशी मागणी भाजपचे प्रवक्ते एम.जे.अकबर यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या