नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान एकही जवान शहीद झाला नसल्याची असत्य माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत दिल्याचा आरोप करून काँग्रेसने सोमवारी त्यांच्या राजीनाम्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माफीनाम्याची मागणी केली.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सहा हुतात्मा जवानांची माहिती लपवून, त्यांना सन्मानापासून वंचित ठेवून, त्यांचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या माजी सैनिक विभागाचे कर्नल रोहित चौधरी (नि.) म्हणाले, ‘भाजप सैनिकांविषयी मोठ्या गोष्टी करतो. त्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी करतो आणि त्यांचा अपमान करतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये एकही भारतीय जवान शहीद झाला नाही, असे विधान संरक्षणमंत्र्यांनी संसदेत केले, तेव्हा भाजपचे खासदार टाळ्या वाजवत होते. या साऱ्या लोकांना संसदेत बसण्याचा हक्क नाही. राजनाथसिंह यांनी देशाचे लष्कर आणि जवानांचा अपमान केला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा.’ चौधरी यांच्यासमवेत विंग कमांडर अनुमा आचार्य या देखील उपस्थित होत्या.
