जयपूर : राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा सहभाग असल्याचा आरोप होत असून काँग्रेसने शेखावत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राजस्थानमध्ये दोन फिती व्हायरल झाल्या असून त्यामध्ये शेखावत हे गेहलोत सरकार पाडण्याबाबत संभाषण करीत असल्याचे ऐकू येत आहे त्याकडे लक्ष वेधून काँग्रेस नेते अजय माकन यांनी, शेखावत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. फितीमधील आवाज आपला नसून गजेंद्रसिंह नामक दुसऱ्या व्यक्तीचा आहे असा दावा केंद्रीय मंत्री करीत असतील तर ते आपल्या आवाजाचे नमुने देण्यास का घाबरत आहेत, असा सवाल माकन यांनी केला आहे.
राजस्थान विधानसभेचे अधिवेशन याच आठवडय़ात?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतल्यानंतर, राजस्थान विधानसभेचे अल्पकालीन अधिवेशन या आठवडय़ात बोलाविण्यात येण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
राजस्थानमधील सत्तानाटय़ात प्रमुख भूमिकेचा ‘बीटीपी’चा दावा
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार सत्ता टिकविण्यासाठी धडपड करीत असतानाच आपणच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा भारतीय आदिवासी पक्षाने (बीटीपी) केला आहे.
राजस्थान विधानसभेत बीटीपीचे केवळ दोनच सदस्य असले तरीही आम्हीच किंगमेकर ठरणार असल्याचा दावा पक्षाचे अध्यक्ष महेशभाई सी. वसावा यांनी रविवारी केला. बीटीपीचे आमदार राजकुमार रोअत आणि रामप्रसाद दिनोर यांनी आपण मुख्यमंत्र्यांसोबतच असल्याचे काँग्रेसबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे गुजरातस्थित पक्षाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत या दोन आमदारांनी सत्तारूढ काँग्रेसला मदत केली. मात्र गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष उघड झाल्यानंतर बीटीपीने तटस्थ राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आदिवासी विभागातील विकासकामांशी संबंधित मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर बीटीपीने गेहलोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
