काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना एका बिल्डरवर मेहेरनजर दाखवून मोबदल्यात कोटय़वधी रुपये घेतल्याचा आरोप काँग्रेसने नाकारला आहे.
मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष नंदकुमार सिंग चौहान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या प्राप्तिकर अपेलेट लवादातील दस्ताऐवजांच्या आधारे केला होता. या आरोपाबाबत दिग्विजय सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, राज्य काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी हे आरोप राजकीयदृष्टय़ा प्रेरित असून दिग्विजय सिंग यांचे उट्टे काढण्यासाठी करण्यात आल्याचा दावा केला.
भाजपजवळ काँग्रेस नेत्यांविरुद्ध खरेच काही विश्वासार्ह पुरावा असेल तर त्यांनी राजकीयदृष्टय़ा ब्लॅकमेल करण्याऐवजी या नेत्यांना तुरुंगात पाठवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
गोव्यात गांधी जयंतीची सुटी कायम
पीटीआय, पणजी
गोवा सरकारने सादर केलेल्या सुटय़ांच्या यादीतून गांधी जयंतीची (२ ऑक्टोबर) सुटी वगळली गेल्यावरून सुरू झालेल्या वादावर पडदा पाडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नजरचुकीने तसे झाले असावे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
गोवा सरकारने शनिवारी नववर्षांचे कॅलेंडर आणि सरकारी सुटय़ांची यादी प्रसिद्ध केली. त्यात २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुटीचा उल्लेख नव्हता. भाजपशासित गोव्यात राज्य सरकारने जाणूनबुजून ही चूक केली असल्याचा दावा काँग्रेसने केला.
काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी म्हटले की, राज्य सरकारचा हा निर्णय राष्ट्रविरोधी असून भाजपची संकुचित मनोवृत्ती दाखवणारा आहे. कोणतेही राज्य सरकार अशी चूक करू शकत नाही. गांधी जयंती हा राष्ट्रीय दिवस आहे. केंद्र सरकारने ताबडतोब राज्य सरकारला ही चूक सुधारण्याच्या सूचना द्याव्यात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वादात न पडण्याचा पवित्रा घेतला.