Mani Shankar Aiyar on Congress TVK Support: तमिळनाडूमधील राजकीय घडामोडींचे परिणाम राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. ४ मे रोजी निकाल लागलेल्या विधानसभा निवडणुकीत जोसेफ विजयच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला सर्वाधिक १०८ जागा मिळाल्या असल्या तरी बहुमताच्या संख्येपासून ते दूर राहिले. यामुळे बहुमत गाठण्यासाठी काँग्रेसने विजयला पाठिंबा दिला. मात्र यामुळे इंडिया आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेसने निवडणुकीआधी द्रमुकशी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र आता विजयला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने द्रमुकशी असलेली ५० वर्षांपूर्वीची आघाडी मोडली आहे. द्रमुक पक्षासह आता काँग्रेसचे नेतेही यावर टीका करत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी द्रमुकशी असलेली आघाडी मोडल्यानंतर स्वतःच्या पक्षावर टीका केली आहे. विजयच्या पक्षाशी युती केल्यामुळे काँग्रेसने महात्मा गांधींचे नैतिकतेचे सरकार स्थापन करण्याच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे.
मणीशंकर अय्यर म्हणाले, “१०० वर्षांपूर्वी नोव्हेंबर १९२५ मध्ये महात्मा गांधी यांनी ‘नवजीवन’ या गुजराती मासिकातून असा संदेश दिला होता की, स्वराज्य म्हणजे नैतिकतेवर आधारित सरकार असायला हवे. काँग्रेसने मागच्या निवडणुकीत टीव्हीके पक्षाचा विरोध केला होता. त्यानंतर आता स्वतःहूनच काँग्रेस पक्ष सत्तेच्या जहाजात जाऊन बसला आहे. हा महात्मा गांधींच्या काँग्रेस पक्षाने त्यांनीच दिलेल्या विचाराला फाटा दिला आहे. अशाप्रकारचे राजकारण फार काळ टिकत नाही.”
विधानसभेतील बलाबल किती?
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने २३४ पैकी तब्बल १०८ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. तर काँग्रेस, द्रमुक यांच्या आघाडीला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. द्रमुक पक्षाला केवळ ५९ तर काँग्रेसला फक्त ५ जागांवर विजय मिळवला. टीव्हीकेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी ११ जागा हव्या आहेत.
४ मे रोजी निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेच्या विनंतीला मान देत काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवला. काँग्रेसने इंडिया आघाडी धोक्यात घालून सत्तास्थापनेसाठी विजयच्या पक्षाला पाठिंबा दिला असला तरी अद्याप सरकार स्थापनेसाठी आणखी ६ जागांची आवश्यकता आहे.
हा तर राजकीय मूर्खपणा
मणीशंकर अय्यर हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. स्वा. सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर शिवसेनेचे संस्थापक नेते, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले होते. यावेळी अय्यर यांनी स्वतःच्या काँग्रेस पक्षालाच लक्ष्य केले आहे.
ते म्हणाले, “काँग्रेसच्या आघाडी मोडण्याच्या निर्णयात एकप्रकारची राजकीय अकार्यक्षमताही दिसते. द्रमुकच्या आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडल्यानंतर इतरही लहान (आपल्यापेक्षाही) पक्ष बाहेर पडतील आणि टीव्हिकेल पाठिंबा देतील, असे वाटले होते. पण काँग्रेसनंतर इतर कोणत्याही पक्षाने द्रमुकच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आपण विजय यांच्याबरोबर जाण्याचे अनैतिक कृत्य तर केलेच आहे. पण त्यांना बहुमत मिळेल याची खात्र न करण्याचा राजकीय मूर्खपणाही केला आहे.”
लोकसभेत डीएमकेची वेगळी चूल
काँग्रेसने युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने डीएमके मात्र चांगलीच नाराज झाली आहे. काँग्रेस आणि डीएमकेमधील नाराजी आता उघडपणे समोर आली असून, खासदार कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सभागृहातील आसनव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली आहे.
द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सभागृहातील डीएमके सदस्यांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली आहे. बदललेली राजकीय परिस्थिती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतची पक्षाची युती संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर, डीएमके सदस्यांनी काँग्रेस खासदारांसोबत बसणे योग्य होणार नाही, कनिमोळी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले असून, आसनव्यवस्था बदलण्याची मागणी केली.
