गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षावर ताशेरे ओढले. देशाने त्यांच्या योगदानाचा सन्मान केला मात्र काँग्रेसला त्यांची गरज नाही, हा खूप मोठा विरोधाभास आहे असं वक्तव्य कपिल सिब्बल यांनी केलं आहे. ट्वीट करत सिब्बल यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहे. काँग्रेस नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे G-23 गटामध्ये सामील आहेत. हा गट पक्षाच्या नेतृत्वामध्ये संघटनात्मक बदल करण्याची मागणी करत होता. केंद्र सरकारकडून गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावरून कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. देशाला त्यांचं योगदान कळलं, त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. पण काँग्रेसला मात्र त्यांची गरज नाही. हा फार मोठा विरोधाभास आहे, असं सिब्बल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. कपिल सिब्बलही याच G-23 गटामध्ये सामील आहेत. या गटातले काँग्रेस नेत शशी थरूर यांनीही गुलाम नबी आझाद यांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे. थरूर लिहितात, गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. सार्वजनिक जीवनातल्या योगदानाबद्दल दुसऱ्या पक्षाच्या सरकारकडून सन्मान देण्यात येणं ही चांगली गोष्ट आहे. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मात्र यावरून टोला लगावला आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार सन्मान नाकारला. याबद्दल बोलताना ते म्हणाले, हा योग्य निर्णय आहे. त्यांना 'आझाद' (स्वतंत्र) राहायचं आहे 'गुलाम' नाही.