केवळ ४० खासदारांमुळे देशाच्या विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसत असून, काँग्रेस नकारात्मक राजकारण करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

उत्तराखंडमधील हृषीकेश, उत्तर प्रदेशातील सहारणपूर तसेच चंदीगढ येथील कार्यक्रमांमध्ये मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. प्रभावी विरोधक व नकारात्मक राजकारण यात मोठा फरक आहे, अशा शब्दांत त्यांनी संसदेच्या कामकाज रोखून धरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला पराभूत केले आहे. आता ते सूड उगवत आहे. मात्र जनता अशा व्यक्तींचे राजकारण ओळखेल, असा टोला मोदींनी लगावला.
देशाच्या विकासात असे अडथळे आणल्यास पुढील निवडणुकीत त्यांना एक जागा जिंकणे कठीण जाईल, असा इशारा मोदींनी दिला. चंदीगढ येथील भाषणातही मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. लोकांनी निवडून दिलेले जे ४० प्रतिनिधी आहेत ते लोकशाहीही प्रतारणा करीत आहेत. त्यांचे हे वर्तन आम्ही जनतेपुढे नेऊ, असे सांगत पंतप्रधानांनी थेट काँग्रेसला आव्हान दिले.
मुलायमसिंहांचे कौतुक
सहरानपूर: संसदेतील कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत कौतुक केले. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राने सहा हजार कोटी रुपये दिल्याचे सांगितले. सोनिया व राहुल यांच्यावरही मोदींनी टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपला मुलगा पंतप्रधान कसा झाला नाही याचे आश्चर्य वाटले. तर एक चहावाला कसा पंतप्रधान झाला याचा विचार परदेशात शिकलेले राहुल करीत राहिले, असा टोला मोदींनी लगावला.
माजी सैनिकांच्या ‘एक श्रेणी – एक निवृत्तिवेतन’ या गुंतागुंतीच्या मुद्दय़ावर मोदी म्हणाले, की यापूर्वीच्या यूपीए सरकारने या योजनेसाठी केवळ ५०० कोटी रुपये मंजूर केले होते, पण आमच्या सरकारने या प्रकरणी लक्ष घातले तेव्हा यासाठी १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची जाणीव झाली. या योजनेबाबत संबंधितांशी बोलणे झाले आहे. मात्र योजनेची घोषणा केल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या लोकांविषयी त्यांनी नापसंती व्यक्त केली.

सत्तेमुळे मोदींमध्ये उद्दामपणा -सुरजेवाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. चंदिगढ मोदींच्या सभेमुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आधी चुका करायच्या नंतर माफी मागायची, ही मोदींची सवय आहे, असा आरोप काँग्रेसने करीत सत्तेमुळे त्यांच्यात अहंभाव आल्याचे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.