राजकीय पक्षांवर, नेतेमंडळींवर आणि त्यांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. हे आरोप नेहमीच फेटाळले जात असतात. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी कमिशनमधून कोट्यवधींची माया गोळा केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ ‘चुकून’ ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे माध्यम समन्वयक आणि माजी खासदार दुसऱ्या माजी खासदारांच्या कानात प्रदेशाध्यक्ष कसा भ्रष्टाचार करत आहेत, याविषयी चर्चा करताना दिसत आहेत. पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही वेळ आधीचा हा व्हिडीओ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा सगळा प्रकार घडलाय कर्नाटकमध्ये. काँग्रेसचे माजी खासदार आणि माध्यम समन्वयक सलीम आणि माजी खासदार उग्रप्पा पत्रकार परिषद घेणार असल्यामुळे सर्व माध्यम प्रतिनिधी तयार झाले होते. टेबलवर नेहमीप्रमाणे माईक लावून ठेवले होते. समोर उग्रप्पा आणि सलीम बसले होते. मात्र, आपल्यासमोरचे माईक सुरू आहेत, याची त्यांना कल्पनाच नसावी. त्यामुळे सलीम यांनी उग्रप्पा यांच्या कानाशी बोलताना काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांच्याबाबत गंभीर दावे करणारी विधानं केली. यामध्ये शिवकुमार यांनी कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केल्याचं सलीम सांगताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सलीम यांनी शिवकुमार यांचा उल्लेख कानडी भाषेत बोलताना कलेक्शन गिराकी अर्थात एजंट असा केला आहे. त्यांनी कमिशनमधून कोट्यवधी रुपये जमा केले असून हा एक मोठा घोटाळा आहे. खोदून काढलं तर प्रकरण थेट शिवकुमार यांच्यापर्यंत पोहोचेल, असं सलीम सांगताना दिसत आहेत.

डी शिवकुमार हे काँग्रेस-संयुक्त जनता दलाच्या आघाडी सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री होते. या व्हिडीओत सलीम उग्रप्पांना सांगतायत की शिवकुमार एखाद्या मद्यपी व्यक्तीप्रमाणे बोलतात, तर सिद्धरामय्या फार कडक वाटतात. त्याउलट उग्रप्पा म्हणतातयत, की शिवकुमार यांच्या नेतृत्वामुळेच पक्षाला पुन्हा उभारी घेण्यात अपयश आलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेसनं सलीम यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली असून उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर शिवकुमार यांनी देखील खुलासा देणारी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकारामुळे पक्षाची मान शरमेनं खाली गेली आहे. ही विधानं पक्षाशी किंवा माझ्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. हे त्यांचं अंतर्गत संभाषण होतं”, असं शिवकुमार म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ex mp saleem video allegations on karnataka state president d k shivakumar pmw
First published on: 13-10-2021 at 19:05 IST