scorecardresearch

उत्तर प्रदेशात पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्याचा लेटर बॉम्ब; प्रियंका गांधींच्या राजीनाम्याची केली मागणी

सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे

Congress expelled Zeeshan Haider demands Priyanka Gandhi Vadra resignation
(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे. पराभवानंतर पक्षाने सहा वर्षांसाठी हाकलून दिलेला झिशान हैदर यांनी प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे. झिशान हैदर यांनी मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून झिशान हैदर यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वड्रा यांना ४०३ जागा देऊनही झालेल्या पराभवाला जबाबदार धरले आहे. झिशान हैदर म्हणाले की, याआधीही जेव्हा-जेव्हा राज्यात निवडणुकीचे निकाल वाईट आले, तेव्हा उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि प्रभारी दोघांनीही राजीनामा दिला आहे. अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राजीनामा दिला आहे, आता प्रियंका गांधी वड्रा यांनीही राजीनामा द्यावा. प्रियंका गांधी वढेरा यांच्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचा आरोप झिशान यांनी केला. आता त्यांनी राजीनामा द्यावा असे झिशान हैदर म्हणाले.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रियांका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षांतर्गत जोर धरू लागली आहे. पराभवाची जबाबदारी कोणाची नसून ती सर्वांची आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या उच्च पदांवर बसलेल्यांनाही आत्मपरीक्षण करावे लागेल आणि उत्तर प्रदेश निवडणुकीतील पराभवाची सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल, असे हैदर यांनी म्हटले.

झिशान हैदरने सोनिया गांधींना पत्र लिहून प्रियंका गांधींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. झिशान हैदर यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षाने प्रियंका गांधी यांच्याकडून सरचिटणीसपद काढून घ्यावे आणि त्यांना मुक्त करावे. पराभावाचे संपूर्ण खापर प्रदेशाध्यक्षांवर फोडणे चुकीचे आहे. कारण राज्यातील सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना माहित आहे की प्रभारी जर स्वतः प्रियांका असतील तर प्रदेशाध्यक्ष स्वतःच्या मर्जीने साध्या शिपायाची देखील नेमणूक करु शकत नाहीत. जोपर्यंत प्रियांका गांधी आहेत, तोपर्यंत त्यांचा पराभव करणारे सेवक त्यांच्यासोबत राहतील आणि तीच टीम राहील. प्रियांका गांधी यांच्या टीममुळेच उत्तर प्रदेशात ३८७ मतदार संघामधील आमची अनामत रक्कम जप्त झाली आहे. काँग्रेस पक्ष सर्वांचा आहे, असे म्हणतात, त्यामुळे काँग्रेस पक्ष हा जितका तुमचा आहे तितकाच आम्हा सर्वांचा आहे. पक्षाच्या भल्यासाठी एखादे पाऊल उचलायचे असेल तर ते उचलण्यास मागेपुढे पाहता कामा नये.

यापूर्वी काँग्रेसने झिशान हैदर यांच्यावर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कारवाई केली होती. ११ मार्च रोजी काँग्रेसने झिशान हैदर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. ४०३ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या, तर २०१७ मध्ये पक्षाला सात जागा मिळाल्याचा आरोप झिशानने केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress expelled zeeshan haider demands priyanka gandhi vadra resignation abn

ताज्या बातम्या