पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या कार्यकाळाचे ४ हजार ३९९ दिवस पूर्ण झाल्याने भारत मंडपम या ठिकाणी एनडीएची एक खास परिषद घेण्यात आली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हिंदू ग्रोथ रेट असं म्हणत काँग्रेसने आपलं अपयश झाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
काँग्रेस बाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
काँग्रेस नेतृत्वात असलेल्या यूपीए सरकारच्या कार्यकाळाबाबत भाष्य केलं. देशाला काँग्रेसच्या कुशासनापासून स्वातंत्र्य मिळालं आहे. काँग्रेसने भारताच्या जनतेचा हा समज करुन दिला होता की भारतात विकासाला गती येणारच नाही. भारताचा विकास संथ गतीनेच होईल. त्यांनी त्यांचं अपयश झाकण्यासाठी हिंदू ग्रोथ ऑफ रेट असं नाव देऊन टाकलं आणि विकास करण्याची जबाबदारी झटकून टाकली. काँग्रेसने त्यांचं अपयश झाकण्यासाठी हिंदूंवर खापर फोडलं. त्यांच्या अपयशाला हिंदू ग्रोथ ऑफ रेट नाही तर काँग्रेस रेट ऑफ ग्रोथ रे असं म्हटलं गेलं पाहिजे अशी टीका पंतप्रधानांनी केली.
२००४ मध्ये देश काँग्रेसच्या सत्तेत फसून गेला-मोदी
देश काँग्रेसच्या कु-चक्रातून स्वतंत्र झालेला आहे. काँग्रेसने देशाला लाचारी, हीन भावनेत ढकलून दिलं होतं. भारतात विकास हळूहळूच होतो, असं वारंवार सांगितलं जात होतं. भारतात गतीने विकास करणे शक्यच नाही, असे काँग्रेसकडून भासवले जात होते. या हळूहळू विकासाला हिंदू ग्रोथ रेट असे नाव दिले होते. ही कार्यशैली काँग्रेसची होती, अपयश काँग्रेसचे होते, जबादारी काँग्रेसची होते. परंतु कलंक मात्र देशातील हिंदू लोकसंख्येवर लावलण्यात आला अशी टीका मोदी यांनी त्यांच्या भाषणात केली. काँग्रेस सत्तेत असताना सरकार नव्हते, नीती नव्हती, विचार नव्हता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच एनडीए सरकार आले. एनडीएचे सरकार पहिल्यांदा आल्यानंतर विकासात गती कशी येते, हे आपल्याला पाहायला मिळाले. परंतु दुर्दैवाने २००४ साली देश पुन्हा अस्थिरतेच्या वादळात आणि काँग्रेसच्या सत्तेत फसून गेला. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर देशाला हजारो, कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ढकलून दिले असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
मी कधीही विचार केला नव्हता की दीर्घकाळ पंतप्रधानपदी राहीन-मोदी
मागील १२ वर्षांच्या राजकीय प्रवासात मी अनेक उतार-चढाव पाहिले. मी हा विचारही कधी केला नव्हता की मी दीर्घकाळ मी पंतप्रधान पदावर राहिन आणि देशाची सेवा करेन. मला ही संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. मला तुम्ही सगळ्यांनी पंतप्रधान म्हणून निवडलंत यासाठी मी तुम्हा सगळ्यांचा आणि देशाच्या जनतेचा आभारी आहे. मला भारतमातेची सेवा करण्याची संधी ही दीर्घकाळ लाभली आहे. जनता जनार्दन रुपी ईश्वराचा हा आशीर्वाद आहे असंच मी समजतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
