काँग्रेस अनुकूल; दिग्विजयसिंह यांचे स्पष्टीकरण
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी सक्रिय राजकारणात यावे अशी पक्षाची इच्छा आहे, मात्र त्याबाबतचा निर्णय त्यांचे कुटुंबीय घेतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. प्रियंका गांधी-वढेरा यांच्यात जनतेच्या नेत्या म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे, असेही दिग्विजयसिंह म्हणाले.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रियंका महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत का, असे विचारले असता दिग्विजयसिंह म्हणाले की, हा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावयाचा आहे. मात्र काँग्रेस पक्षाचा विचार करता त्या सक्रिय राजकारणात आल्यास ती आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले. प्रियंका गांधी-वढेरा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ वगळता अन्यत्र प्रचार करणार का, असे विचारले असता इंदिरा गांधी आणि प्रियंका यांच्यात साधम्र्य असल्याचे त्यांनी सांगितले.

रघुराम राजन यांची पाठराखण
हैदराबाद : भाजप खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची उचलबांगडी करण्याची मागणी केलेली असतानाच काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी मात्र राजन यांची पाठराखण केली आहे. रघुराम राजन हे सक्षम असल्याने त्यांना मुदतवाढ द्यावी, असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. रघुराम राजन हे सक्षम अधिकारी आहेत, गव्हर्नर म्हणून त्यांची कामगिरी उत्तम आहे त्यामुळे त्यांना मुदतवाढ द्यावी, असे आपल्याला वाटते असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. राजन हे मनाने परिपूर्ण भारतीय नाहीत त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, असे डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे याकडे लक्ष वेधले असता दिग्विजयसिंह यांनी, डॉ. स्वामी यांच्याबद्दल काय, असा सवाल केला.