देशातील तीन लोकसभा आणि २९ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानुसार भाजपाला विशेष कामगिरी करता आली नाही. यावर काँग्रेसने नरेंद्र मोदींवर टीका करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पोटनिवडणुकांचे निकाल हे काँग्रेससाठी सकारात्मक संकेत असल्याचे म्हटले आणि पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी तीन कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केली. या निकालाला देशाचा मूड म्हणून पाहिले जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहंकार सोडावा, असा सल्ला देखील काँग्रेसने दिला आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर लिहिले की, “लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने ३ पैकी २ जागा गमावल्या आहेत. काँग्रेस-भाजप३मध्ये थेट लढत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला आहे, हिमाचल, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र याचा पुरावा आहे. मोदीजी, हट्ट सोडा! तीन काळे कायदे मागे घ्या, पेट्रोल-डिझेल-गॅसची लूट थांबवा, अहंकार सोडा.”

काँग्रेसने मंडी लोकसभा जागा आणि हिमाचलच्या तीनही विधानसभा जागा (फतेहपूर, अर्की आणि जुब्बल-कोटखाई) जिंकल्या आहेत. सुरजेवाला म्हणाले, “लोकसभेच्या तीन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दोन जागांवर पराभव झाला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसशी थेट लढत झालेल्या बहुतांश जागा भाजपने गमावल्या आहेत.”