काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हार्दिक पटेल यांच्या पुढील राजकीय भूमिकेविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गुजरात काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पुढील पाऊल टाकण्याआधी दखल घेत असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

गुजरात निवडणूक जवळ असतानाच हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे. मुलाखतीत बोलताना हार्दिक पटेल यांनी आपण जेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तेव्हा वडील नेहमी तू चुकीचा पक्ष निवडला आहेस सांगायचे असा खुलासा केला. यावेळी हार्दिक पटेल यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला.

“निर्णय झाला आहे आणि लवकरच तुम्हा सर्वांना याची माहिती मिळेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या राजकीय आयुष्यात चार मुद्दे सोबत घेत पुढील वाटचाल करत असतो, ज्यामध्ये समाज, देस आणि राज्याच्या भल्याचाही विचार असतो,” असं हार्दिक पटेल यांनी सांगितलं.

विश्लेषण : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले हार्दिक पटेल गुजरात विधानसभा निवडणुकीत किती प्रभावी ठरु शकतात ?

“पुढील वाटचाल करत असताना काँग्रेस पक्षात राहून जे मी मिळवू शकलो नाही ते सर्व मिळवायचं आहे. मी त्याच मार्गावर चालणार असून गुजरातमधील जनतेच्या भल्यासाठी काम करणार आहे,” असंही ते म्हणाले

भाजपामध्ये प्रवेश कऱणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता हार्दिक पटेल यांनी पुढील १० दिवसांत आपला निर्णय जाहीर करु असं सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत मी सांगितलेल्या चार मुद्द्यांवर काम करण्यास काँग्रेस पक्ष तयार होता असं वाटत नसल्याचं म्हटलं.

“मी गेल्या सात वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत नाही. गुजरातमधील जनतेला काँग्रेस पक्ष आवडत नसून त्यांना स्वीकारण्यास ते तयार नाहीत. त्यांची पसंती भाजपाला आहे. मी ज्या चार मुद्द्यांबाबत बोलत आहे ते सत्तेत असणाऱ्या पक्षाशी सुसंगत आहेत. पुढील १० दिवसांत माझा निर्णय सर्वांसमोर असेल,” असं हार्दिक पटेलने सांगितलं.

“काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष”- हार्दिक पटेल

जिग्नेश पटेल यांनी हार्दिक पटेल यांच्यावर टीका केली असून वैचारिक तडजोड केल्याची टीका केली आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना हार्दिक पटेल म्हणाले की, “वैचारिक मतभेद असणाऱ्या पक्षात अशा अनेक चर्चा होत असतात. माझी विचारधारा फक्त जनहिताची आहे. काँग्रेस नेमकं कशासाठी काम करत आहे? जर मी जनहितासाठी काम करत असल्याने माझी विचारधारा बदलली असं तुम्ही म्हणत असाल तर हो माझी विचारधारा बदलली आहे. मग तो समाज, राज्य किंवा देशाच्या हिताचा विषय असो, मी विचारधारा बदलली आहे”. जिग्नेश मेवानी आपले मित्र असल्याचं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.

दरम्यान आपल्या या निर्णयामुळे आपली पत्नी आणि तिचं कुटुंब आनंदी असल्याचं हार्दिक पटेल म्हणाले आहेत. “काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पत्नी आणि तिचं कुटुंब आनंदी आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या विचारधारेसोबत आहेत. मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्नीच्या कुटुंबाने निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. माझे वडीलही जिवंत होते तेव्हा त्यांना तू चुकीचा पक्ष निवडल्याचं म्हटलं होतं. आता माझ्या कुटुंबातील सर्वजण आनंदी आहेत,” असं हार्दिक पटेल यांनी सांगितलं.