काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. मी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी माझा छळ सुरू केला, असे त्या म्हणाल्या. खेरा यांच्या या आरोपानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान यावरुन आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या डीएनएमध्येच रामद्रोह आहे, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

उत्तर प्रदेशातील एका सभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी खेरा यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसवर टीका केली. “राधिका खेरा या अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनासाठी आल्या आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यावरून काँग्रेस नेत्यांच्या मनात प्रभू रामाविषयी असलेला द्वेष दिसून येतो. खरं तर काँग्रेस असेल किंवा त्यांचे मित्र पक्ष असतील, यांच्या एनडीएमध्ये रामद्रोह आहे. ज्या लोकांच्या डीएनएमध्ये रामद्रोह आहे. देशातील जनता त्यांना कधीही मतदान करणार नाही ”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “नादी लागू नका, प्रकरणे बाहेर काढेन”, राजन विचारे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राधिका खेरांनी केले होते काँग्रेसवर गंभीर आरोप

तत्पूर्वी राधिका खेरा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. “काँग्रेस राम विरोधी, सनातन विरोधी आणि हिंदू विरोधी आहे, हे मी आजवर ऐकत आले होते. मात्र मला त्यावर विश्वास बसत नव्हता. महात्मा गांधी हे ‘रघुपती राघव राजा राम’ असे बोलून बैठकीची सुरुवात करायचे. मी माझ्या आजीबरोबर अयोध्येत जाऊन आल्यानंतर माझ्या घरावर जय श्री राम लिहिलेला झेंडा लावला त्यानंतर काँग्रेस पक्षाने मला वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली”, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तसेच “मी जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर माझे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असे, तेव्हा तेव्हा काँग्रेसकडून मला दमबाजी करण्यात यायची. निवडणूक प्रक्रिया सुरू असून हे फोटो टाकण्याची गरज नाही, असे मला सांगितले जात असे, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress have ramdroh in their dna yogi adityanath criticized after radhika kheras allegation spb