Congress Reply To PM Modi Zero Seat Remark MLC Elections: विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या फिरकीला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नागपूर आणि वाराणसीतील निकालांचा दाखला देत काँग्रेसने भाजपाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चार राज्यातील विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी निवडणूक पार पडली. दोन दिवस चाललेल्या मतमोजणीत सुरुवातीला काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. त्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या इतर नेत्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता न आल्याने पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेसला लक्ष्य केले होते.
“उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या होत्या. अंदाज लावा, यात काँग्रेसने किती जागा जिंकल्या?”, असा टोला लगावत पंतप्रधानांनी विरोधकांच्या मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याच्या मागणीवरून काँग्रेसला डिवचले होते.
पंतप्रधानांच्या या टीकेनंतर काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत भाजपाला झालेल्या पराभवांची आठवण करून दिली. विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राउंड आणि संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधील पदवीधर मतदारसंघात आणि पंतप्रधान मोदींचा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील पराभवाकडे काँग्रेसने लक्ष वेधले.
वाराणसीवरून पंतप्रधानांवर टीका
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचा समाचार घेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. २०२४ च्या निवडणुकीत वाराणसीतून मोदींच्या विजयाचे मताधिक्य लक्षणीयरीत्या घटले होते. श्रीनेत म्हणाल्या, “पंतप्रधान आज बॅलेट पेपरवर बोलत आहेत. आधी त्यांनी हे सांगावे की, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मतपत्रिकेवर मतदान झाले तेव्हा त्यांचा पराभव कसा झाला?” मागील निवडणुकीत पंतप्रधानांनी कटकारस्थान रचून विजय मिळवला होता, असा आरोप केला.
“पंतप्रधानांनी आता पुन्हा वाराणसीत जाण्याची चूक करू नये, अन्यथा त्यांचा पराभव निश्चित आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनीही पंतप्रधानांना आव्हान दिले. “जर पंतप्रधानांना मतपत्रिकेवर एवढाच विश्वास वाटत असेल, तर त्यांनी आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधकांची मागणी मान्य करावी,” असे खेरा म्हणाले. तसेच पंतप्रधानांनी मतपत्रिकेचा उल्लेख करताना वाराणसीच्या निकालावर मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी केला.
नागपूर आणि वाराणसीत भाजपाला धक्का
महाराष्ट्रात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवत ही जागा राखली. त्यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा ३,२७१ मतांनी पराभव केला. वंजारी यांना ६७,२३१ मते मिळाली, तर कोहळे यांना ६३,९६० मतांवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले. या जागेवर सपाचे लाल बिहारी यादव विजयी झाले.
१२ जागांपैकी एका ठिकाणी विजय
एकूण विधानपरिषद निकालांचा विचार करता काँग्रेससाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. काँग्रेसने ४ राज्यात लढवलेल्या १२ जागांपैकी फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. विशेषतः कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असतानाही भाजपा-जेडीएस युतीने विधानपरिषदेच्या चारही जागांवर विजय मिळवून काँग्रेसला मोठा झटका दिला.
