पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. विधानसभेच्या ११७ पैकी ९२ जागा जिंकत राज्यातील सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा उडवला. राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या अकाली दलाला केवळ तीन जागा जिंकता आल्या. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाला एक जागा मिळाली. तर काँग्रेसला १८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला दोन जागा मिळाल्या. आपचे भगवंत मान यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद येईल.

बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन होईल असे भाकीत वर्तवले होते, निकालही त्याच दृष्टीने लागला. आपच्या तडाख्यात मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी पराभूत झाले तसेच प्रकाशसिंग बादल तसेच सुखबिर बादल यांनाही धक्का बसला. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठीया तसेच पंजाब सरकारमधील काँग्रेसचे अनेक मंत्री पराभूत झाले.

nilesh kumbhani
भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?
BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
congress bastar candidate kawasi lakhma
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा
Big problem for Congress in Ramtek candidates caste certificate invalid
रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

विरोधी पक्षनेते हरपालसिंग चीमा तसेच पंजाब भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विनी कुमार हे पठाणकोट येथून तसेच काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा हे क्वेदीन तसेच कपूरथळा येथून मंत्री राणा गुरजित सिंग हे विजयी झाले. २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसने अकाली दल-भाजपची दहा वर्षांची राजवट संपवली होती. गेल्या वेळी काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पक्षाला २० जागा जिंकता आल्या होत्या. अकाली दल-भाजप आघाडीला १८ तर लोक इन्साफ पक्षाला दोन ठिकाणी यश मिळाले होते. आपचे भगवंत मान हे धुरी मतदारसंघातून ५८ हजार २०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या दलविर सिंग गोल्डी यांचा पराभव केला.

दोन मुख्यमंत्री तर पाच माजी उपमुख्यमंत्री पराभूत

नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले. दोन विद्यमान तर पाच माजी मुख्यमंत्री पराभूत झाले. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी तसेच उत्तराखंडचे पुष्करसिंह धामी पराभूत झाले. तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल पराभूत झाले. याखेरीज पंजाबमध्ये राजिंदरकौर भट्टल या माजी मुख्यमंत्री पराभूत झाल्या आहेत. गोव्यात उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर तसेच अन्य एक उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस उमेदवारांकडून पराभूत झाले.

भगतसिंग यांच्या मूळगावी शपथविधी

’पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शहीद भगतसिंग यांच्या मूळ गावी खतर कलन येथे होणार असल्याचे मान यांनी जाहीर केले. त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

’सरकारी कार्यालयांत भगतसिंग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे असतील. मुख्यमंत्र्यांचे नसेल असे त्यांनी नमूद केले.

’आगामी काळात आम आदमी पक्ष राष्ट्रीय स्तरावर पर्याय म्हणून पुढे येईल असे पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितले. पंजाबच्या जनतेने केजरीवाल यांच्या सरकारचे प्रारूप स्वीकारल्याचे चढ्ढा यांनी स्पष्ट केले. 

’पंजाबमध्ये आपला ४२ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसला २२ टक्के व भाजपला ६ तर अकाली दलाला १८ टक्के मते मिळाली.

मुख्यमंत्री चन्नी दोन्ही मतदारसंघांतून पराभूत

चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे भदौर तसेच चमकौर साहिब या दोन्ही मतदारसंघांतून पराभूत झाले. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला. जनतेचा कौल स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया चन्नी यांनी निकालानंतर दिली आहे. चन्नी यांच्याप्रमाणेच अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल हे जलालाबाद मतदारसंघातून पराभूत झाले. त्याचप्रमाणे त्यांचे वडील अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल हेदेखील लांबी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. सुखबीर जवळपास चाळीस हजार मतांनी पराभूत झाले.

अमरिंदर पराभूत

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा देऊन पंजाब विकास काँग्रेसची स्थापना केली होती. अमरिंदर यांचा पारंपरिक मतदारसंघ अससेल्या पतियाळा शहर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला.