नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेचे विधेयक संसदेमध्ये संमत करून घेण्यासाठी केंद्र सरकारने पडद्यामागून जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा होत असताना, या विधेयकाविरोधात काँग्रेसनेही ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या ऐक्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
केंद्र सरकारने एप्रिलमध्ये लोकसभेत मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक विरोधकांनी एकत्रितपणे फेटाळून लावले. पुढील आठवड्यात सोमवारी सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने हे विधेयक मांडले तर पुन्हा विरोधक एकत्रितपणे ते नामंजूर करतील, असे जयराम रमेश म्हणाले. या विधेयकाच्या संदर्भात ‘इंडिया’ आघाडीचे ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सोनिया गांधी द्रमुक आणि ‘आप’ या पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा रमेश यांनी केला.
काँग्रेसच्या संसदीय रणनीती गटाच्या बैठकीला संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. राम मंदिरातील देणगी अपहार, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ‘ई-२०’चा कथित घोटाळा, परराष्ट्र धोरणातील आव्हाने आदी मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे.
राष्ट्रवादी, द्रमुक आमच्याबरोबरच!
प्रत्येक राज्यात ५० टक्के वाढीव जागांची तरतूद विधेयकामध्ये केली गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व द्रमुक हे ‘इंडिया’ आघाडीतील दोन प्रमुख पक्ष विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे मानले जाते. मात्र, त्यांनी विधेयकाला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या चर्चा फेटाळल्याचा मुद्दा रमेश यांनी अधोरेखित केला. शिवसेना ठाकरे गट व तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची फोडाफोडी करून केंद्र सरकारने दोन तृतियांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना विधेयक संमत करता येणार नाही. तसे झाले तर देशाचा आणि संविधानाचा अपमान असेल, अशी टीका रमेश यांनी केली.
‘एफसीआरए’मधील प्रस्तावित दुरुस्त्या, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना ३० दिवसांच्या स्थानबद्धतेनंतर पदावरून दूर करण्याची तरतूद करणारे संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, २०१३ मधील प्रस्तावित दुरुस्त्या, एक राष्ट्र, एक निवडणूक आदी विधेयकांना काँग्रेस विरोध करेल. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
