कर्नाटकात विशेष मतदार यादी फेरतपासणी मोहिमेत ९९.३ लाख मतदारांची नावे वगळल्याने निर्माण झालेल्या वादावर काँग्रेसमध्येच मतभेद समोर आले आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील कारवाई योग्य असल्याचे समर्थन केले, तर प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. या अंतर्गत वादावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात झालेली ही प्रक्रिया योग्यच होती, असा दावा करत त्यांनी इतर राज्यांतील प्रक्रियेवर मात्र प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सतीश जारकीहोळी नेमकं काय म्हणाले?
सतीश जारकीहोळी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “आमच्या आंदोलनामुळे आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रशिक्षणामुळेच कर्नाटकात ‘एसआयआर’ची मोहीम अतिशय पारदर्शक आणि योग्य पद्धतीने झाली. जशी प्रक्रिया कर्नाटकात झाली, तशीच ती पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि बिहारमध्येही व्हायला हवी होती.”
काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर
जारकीहोळी यांनी या कारवाईचे समर्थन केले असले, तरी दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी मात्र या प्रक्रियेवर थेट शंका उपस्थित केली आहे. यादीतून वगळण्यात आलेल्या ‘गैरहजर मतदारांच्या मुद्द्यावरून हरिप्रसाद यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
जारकीहोळी यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, दुबार नोंदणी असलेली, मृत व्यक्तींची आणि इतरत्र स्थलांतरित झालेल्या मतदारांचीच नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. “होय, जे मतदार दुसरीकडे राहायला गेले, ज्यांचा मृत्यू झाला किंवा ज्यांची नावे दोनदा होती, त्यांनाच यादीतून हटवले आहे. ही कारवाई पूर्णपणे रास्त आहे,” असे ते म्हणाले.
भाजपाची काँग्रेसवर टीका
सतीश जारकीहोळी यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते जी. एस. प्रशांत म्हणाले, “मतदार यादी पुनरीक्षणाची ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक आहे, हेच आमचे पक्षश्रेष्ठी सांगत होते. काँग्रेस यावर केवळ राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. या प्रक्रियेत कोणताही कट-कारस्थान नाही आणि नाव वगळणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, हे आता जारकीहोळी यांच्या लक्षात आले आहे. हा एक प्रकारे त्यांनी स्वतःच्याच पक्षाला दिलेला घरचा आहेर आहे.”
विरोधकांचे १ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन
दरम्यान, ‘एसआयआर’ प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत भव्य रॅली काढणार आहे.
