नवी दिल्ली : पक्षाध्यक्षपदासह काँग्रेसमधल्या पक्षांतर्गत निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली. ही निवडणूक देशातल्या सर्वात जुन्या पक्षाची धुरा कुणाकडे जाणार हे स्पष्ट करणारी असेल. राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे.

तब्बल दोन दशकांनी होऊ घातलेल्या या निवडणुकीची अधिसूचना काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी जारी केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केरळमधील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शशी थरूर हे दोघे या पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेहलोत यांनी बुधवारी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर तसे संकेत दिले, तर थरूर यांनी मिस्त्री यांची भेट घेऊन उमेदवारी अर्जाची प्रक्रिया समजावून घेतली. या दोघांखेरीज मनीष तिवारी, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांचीही चर्चा असली तरी या सर्वानी इच्छुक नसल्याचे खासगीत म्हटले आहे. 

दुसरीकडे, राहुल गांधींनीही निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिले. ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान कोचीमध्ये त्यांना याबाबत विचारले असता, ‘‘निवडणूक लढणाऱ्यांनी हे पद केवळ संस्थात्मक नसून विचारधारेचे आहे, याचे भान ठेवावे. त्या जागेवर बसणाऱ्याने ही विचारसरणी लक्षात ठेवली पाहिजे,’’ असे गांधी म्हणाले.

कार्यक्रम..

* अर्ज दाखल करण्याची मुदत – २४ ते ३० सप्टेंबर

* अर्जाची छाननी – १ ऑक्टोबर

* अर्ज मागे घेण्याची मुदत – ८ ऑक्टोबर

* उमेदवारांची अंतिम यादी – ८ ऑक्टोबर, संध्या. ५ वाजेपर्यंत

* मतदान – १७ ऑक्टोबर

* निकाल – १९ ऑक्टोबर

एक व्यक्ती एक पद माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणाचा पुनरुच्चार केला. पक्षाध्यक्षपद घेतले तरी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची इच्छा गेहलोत यांनी बोलून दाखवली होती. मात्र गांधींच्या ताज्या विधानामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता मावळल्याचे मानले जाते. गेहलोत पक्षाध्यक्ष झाले तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या मर्जीतील व्यक्ती बसवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी सचिन पायलटही त्या जागेसाठी इच्छुक असतील.