भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार आराखड्यासंदर्भात दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन जारी केले आहे. यानंतर काँग्रेसकडून त्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. काँग्रेसने शनिवारी म्हटले की या निवेदनातून एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे भारत आता रशियाकडून तेल आयात करणे बंद करणार आहे. तसेच काँग्रेसने दावा केला आहे की या व्यापार करारामुळे अमेरिकेची भारतातील निर्यात वाढेल, मात्र भारताच्या सेवा निर्यात क्षेत्रामध्ये मोठी अनिश्चितता वाढेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१९ मधील ‘हाऊडी मोदी’ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमांचा संदर्भ देत काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली आहे.
जयराम रमेश यांची केंद्र सरकारवर टीका
“आत्ताच प्रसिद्ध झालेल्या अमेरिका-भारत संयुक्त निवेदनात डिटेल्समध्ये काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींवरून हे स्पष्ट होते की:
१. भारत आता रशियाकडून तेल आयात करणार नाही. विशेष म्हणजे, अमेरिकेने अी देखील घोषणा केली आहे की जर भारताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रशियाकडून तेल खरेदी केले, तर २५ टक्के टॅरिफचा दंड पुन्हा लादला जाऊ शकतो.
२. भारतीय शेतकऱ्यांच्या किंमत मोजून अमेरिकन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भारत आयात शुल्कात (Import Duties) मोठी कपात करणार आहे.
३. अमेरिकेतून भारताची वार्षिक आयात तिप्पट होईल, ज्यामुळे वस्तूंच्या व्यापारात भारताचा जो दीर्घकाळापासून व्यापार सरप्लस होता, तो आता संपुष्टात येईल.
४. अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या आयटी आणि इतर सेवांच्या निर्यातीबाबत अनिश्चितता कायम राहील.
५. भारताच्या वस्तू निर्यातीला अमेरिकेत पूर्वीच्या तुलनेत अधिक शुल्काचा सामना करावा लागेल.
इतक्या गळाभेटी आणि ‘फोटो-ऑप्स’ने कोणताही ठोस हाती लागलेले नाही.
‘नमस्ते ट्रम्प’, ‘हाऊडी मोदी’वर भारी पडलं. दोस्त दोस्त ना रहा!” अशी पोस्ट जयराम रमेश यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदींकडून कराराचे स्वागत
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचे स्वागत केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि अमेरिका अंतरिम व्यापार करारावर सहमत झाले आहेत आणि चर्चा पुढे नेण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेबद्दल आभार मानले.
“आम्ही आमच्या दोन महान राष्ट्रांमधील अंतरिम व्यापार करारावर सहमत झालो आहोत. आमच्या देशांमधील मजबूत संबंधांसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा करार भारत-अमेरिका भागीदारीची समृद्धी, विश्वास आणि गतिमानता दर्शवते आणि भारतातील देशांतर्गत विकासाला पाठिंबा देईल. शेतकरी, उद्योजक, लघु उद्योग, स्टार्ट-अप, मच्छीमार आणि नवोन्मेषकांसाठी नवीन संधी निर्माण करून सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला बळकटी देईल.”
“यामुळे महिला आणि तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की दोन्ही देशांनी नवोपक्रमावर जोरदार लक्ष केंद्रित केले आहे आणि या चौकटीमुळे प्रगत क्षेत्रांसह गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारी अधिक दृढ होईल. तथापि, पंतप्रधान मोदींनी नमूद केले की हा करार लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करण्यास आणि जागतिक आर्थिक वाढीला पाठिंबा देण्यास मदत करेल.
“भारत विकसित भारताच्या उभारणीकडे वाटचाल करत असताना, आम्ही भविष्याभिमुख, आपल्या लोकांना सक्षम बनवणाऱ्या आणि सामायिक समृद्धीत योगदान देणाऱ्या जागतिक भागीदारी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत”, असं ते म्हणाले.
फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या अमेरिका-भारत द्विपक्षीय व्यापार करारावर व्यापक चर्चेअंतर्गत नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाटाघाटींनंतर हा अंतरिम आराखडा तयार करण्यात आला आहे .

