जर कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही तर २० जवान शहीद कसे झाले ? अशी विचारणा काँग्रस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असं शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत का सांगितलं ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. पंतप्रधान कार्यालयाने मात्र पंतप्रधानांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

“पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही असं का सांगितलं? पंतप्रधान कार्यालयाने ते शब्द अधिकृत स्टेटमेंटमधून डिलीट का केले ? जर कोणीही आपल्या हद्दीत घुसखोरी केली नाही तर मग २० जवान शहीद आणि ८५ जण जखमी कसे झाले ? आणि १० जवान, अधिकारी चीनच्या ताब्यात कसे गेले?,” असे अनेक सवाल कपिल सिब्बल यांनी विचारले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या विधानाचा विपर्यास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी केलं. आपल्या जवानांनी दाखवलेल्या शौर्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताकडील बाजूस चीनच्या सैनिकांचे अस्तित्व आढळत नाही, असं पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते, असंही पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात नमूद केले आहे.

पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सकाळी ट्वीट करून केंद्र सरकारला धारेवर धरले. चिनी सैनिक भारताच्या भूभागात घुसले नव्हते, तर मग जवान शहीद कसे झाले? जवान नेमके कुठे (भारताच्या की चीनच्या हद्दीत) शहीद झाले, असे प्रश्न विचारण्याबरोबरच चिनी आक्रमणासमोर पंतप्रधानांनी माघार घेतली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनीही शनिवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीतील विधानाचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न केला.