scorecardresearch

काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनींचे पुत्र अनिल अँटनींची काँग्रेसला सोडचिठ्ठी; मोदींवरील बीबीसीच्या माहितीपटास केला आहे विरोध

बीबीसीने बनविलेल्या माहितीपटावरून देशभरातील डाव्या विचासरणीच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनींचे पुत्र अनिल अँटनींची काँग्रेसला सोडचिठ्ठी; मोदींवरील बीबीसीच्या माहितीपटास केला आहे विरोध
(संग्रहित छायाचित्र)

माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अनिल अँटनी यांनी नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या माहितीपटास विरोध दर्शवत, मोदींचे समर्थन केले होते.

अनिल अँटनी यांनी सांगितले आहे की, माझ्यावर ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणला गेला. भारतीय संस्थांच्या तुलनेत ब्रिटिश ब्रॉडकास्टरच्या विचारास महत्त्व दिले तर देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होईल. असे ते म्हणाले होते.

“मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर एक ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणला जात होता. तोही त्यांच्याकडून जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभा राहण्याबाबत बोलतात, मी त्यांना नकार दिला.” असं त्यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले अनिल अँटनी?

अनिल अँटनी यांनी ट्वीट करत या माहितीपटाला विरोध केला आहे. भाजपाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, तरीही मला वाटतं की या माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले. तसेच जे लोकं बीबीसी आणि ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांचं समर्थन करत आहेत, ते लोक चुकीचा पायंडा पाडत आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने बनविलेल्या माहितीपटावरून देशभरातील डाव्या विचासरणीच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे मंगळवारी दिसले. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या माहितीपटाचे सादरीकरण केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच विद्यापीठातील वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले. दुसरीकडे केरळ आणि तेलंगणातील काही विद्यापीठांमध्ये हा माहितीपट दाखविण्यात आल्याने भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारकडून माहितीपटावर बंदी

बीबीसीच्या माहितीटावरून भारतात राजकीय पडसाद उमटल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 10:16 IST

संबंधित बातम्या