scorecardresearch

BBC Documentary : काँग्रेस नेते ए.के. अँटनींच्या मुलाचा ‘बीबीसी’च्या माहितीपटाला विरोध; म्हणाले, “देशाच्या सार्वभौमत्त्वाला…”

काँग्रेसचे वरिष्ठ नेते एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी पंतप्रधान मोदींवरील माहितीपटाला विरोध केला आहे.

BBC Documentary : काँग्रेस नेते ए.के. अँटनींच्या मुलाचा ‘बीबीसी’च्या माहितीपटाला विरोध; म्हणाले, “देशाच्या सार्वभौमत्त्वाला…”
फोटो – द इंडियन एक्सप्रेस

‘बीबीसी’ने नुकताच गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, या माहितीपटावर केंद्र सरकारने बंदी आणल्यानंतर काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी या माहितीपटाला विरोध केल्याने आता विविध राजकीय चर्चेला उधाण आलं.

हेही वाचा – PM मोदी व गुजरात दंगलीवरील बीबीसीचा माहितीपट लावल्यामुळे जेएनयू विद्यापीठाचा वीजपुरवठा खंडित!

नेमकं काय म्हणाले अनिल अँटनी?

अनिल अँटनी यांनी ट्वीट करत या माहितीपटाला विरोध केला आहे. भाजपाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, तरीही मला वाटतं की या माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले. तसेच जे लोकं बीबीसी आणि ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांचं समर्थन करत आहेत, ते लोक चुकीचा पायंडा पाडत आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसने प्रजासत्ताक दिनी या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळ काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शिहाबुद्दीन करयात यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. प्रजासत्ताक दिनी हा माहितीपट काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्यालयात प्रदर्शित केला जाणार असल्याचे त्यांनी या निवेदनात सांगितलं आहे.

हेही वाचा – न्यायवृंदाने गुप्तचर अहवाल सार्वजनिक करणे ही गंभीर बाब; कायदामंत्री रिजिजू यांची टीका सुरूच

केंद्र सरकारकडून माहितीपटावर बंदी

बीबीसीच्या माहितीटावरून भारतात राजकीय पडसाद उमटल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 08:24 IST

संबंधित बातम्या