कर्नाटकमधील काँग्रेस नेते बेलूर गोपाळकृष्ण यांनी भरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची धमकी दिली आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही धमकी दिली. कर्नाटकमधील भाजपा युनिटने या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते बेलूर गोपाळकृष्ण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर बेलूर गोपाळकृष्ण यांनी स्पष्टीकरण दिलं.

कर्नाटक भाजपाने गोपाळकृष्ण यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे. राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपाने काँग्रेस नेते बेलूर गोपाळकृष्ण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी लोकांना उकसवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप केला आहे.

भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांची हत्या करण्याची धमकी काँग्रेस नेत्याने दिली आहे. हा राष्ट्रीय धोका असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी अशी आम्ही विनंती करतो’. दरम्यान बेलूर गोपाळकृष्ण यांनी आपलं वक्तव्य एक महिन्यापुर्वीचं असून भाजपा सध्या त्याचं भांडवल का करते याची आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.