पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवाचा काँग्रेसने धसका घेतलाय. दुसरीकडे काँग्रेसमधील बंडखोर जी-२३ नेत्यांच्या गटाने नेतृत्व तसेच पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवल्याने काँग्रेसमध्ये अस्थितरता वाढली आहे. असे असताना जी-२३ गटातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज (१८ मार्च) बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, पक्षसंघटना तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. गुलाम नबी आझाद यांनी या बैठकीबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलाम नबी आझाद यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. बंडखोर जी-२३ गटातील नेत्यांनी सर्वसमावेशक नेतृत्वावर भाष्य केल्यानंतर या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैटक संपल्यानंतर ” पाच राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर कार्यकारिणीने काही सूचना मागवल्या होत्या. आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक एकजुटीने लढून विरोधकांना पराभूत करण्यावर चर्चा झाली,” असे आझाद यांनी सांगितले.

तसेच काँग्रेसचे अध्यक्षपद आणि जी-२३ मधील नेत्यांनी दिलेला सल्ला यावरदेखील त्यांनी भाष्य केलं. “बैठकीमध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत चांगला संवाद झाला. काँग्रेसच्या सर्वच सदस्यांनी सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, यावर एकमताने निर्णय घेतलेला आहे. आम्हाला फक्त काही सूचना सांगायच्या होत्या. त्या आम्ही सांगितल्या आहेत,” असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दरम्यान, बंडखोर जी-२३ नेत्यांची भूमिका तसेच पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसध्ये वाढत असलेली अस्थिरता लक्षात घेता सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वीही जी-२३ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुधवारी आझाद यांच्या निवासस्थानी बंडखोर नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर गुरुवारी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासोबत बैठक घेतली होती. या आठवड्यात सोनिया यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी दोन वेळा फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर आज या द्वयींमध्ये प्रत्यक्ष बैठक झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader ghulam nabi azad meets congress president sonia gandhi after defeat in 5 states assembly election prd
First published on: 18-03-2022 at 21:02 IST