Congress leader Jairam Ramesh on Modi Government : पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या तपासावरून विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर टीका केली होती. तसेच, सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भाजपा खासदार संबित पात्रा म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानच्या डीजीएमओने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे व्हिडीओ दाखवले होते. काँग्रेस पाकिस्तानला ऑक्सिजन देण्याचं काम करत आहे. दहशतवादी हाफिज सईद देखील म्हणाला होता की त्याला राहुल गांधी आवडतात”. यावर काँग्रेस नेते व खासदार जयराम रमेश यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जयराम रमेश म्हणाले, “चीन पाकिस्तानला ऑक्सिजन पुरवतोय. चीनच्या सहकार्याशिवाय पाकिस्तान काहीच करू शकत नाही. हे युद्ध देखील लढू शकत नाही. चीन त्यांच्याबरोबर नसता तर आपल्याला पाकिस्तानविरोधात आणखी मोठं यश मिळालं असतं. भारताने चीनला देखील रोखायला हवं”.

“मोहम्मद अली जिनांना क्लीन चिट कोणी दिली?”

पहलगाममधील दहशतवादी हल्ला होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. मात्र, हल्लेखोर अद्याप पकडले गेले नाहीत. यावरून जाब विचारणाऱ्या विरोधकांवर भाजपाचे नेते टीका करत आहेत. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आपण हे विसरून चालणार नाही की पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली होती? मोहम्मद अली जिना यांना क्लीन चिट कोणी दिली? त्यांचं कौतुक कोणी केलं होतं? लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानला क्लीन चिट दिली आणि जसवंत सिंह यांनी जिनांचं कौतुक केलं होतं. अडवाणी म्हणाले होते की जिना खूप महान नेते होते. हे सगळे आज भाजपाचे आदर्श आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयराम रमेश यांची पंतप्रधान मोदींवरही टीका

जयराम रमेश म्हणाले, “अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहोर बस यात्रा सुरू केली होती. नवाज शरीफ यांच्याबरोबर नाश्ता करायला कोण गेलेलं? नरेंद्र मोदी गेले होते. त्यांना आंबे आणि शॉल कोणी पाठवली होती? नरेंद्र मोदींनी पाठवली होती. निशान-ए-पाकिस्तान हा खिताब कोणाला मिळाला आहे. या भाजपावाल्यांचे नेते मोरारजी देसाई यांना निशान-ए-पाकिस्तान हा खिताब मिळाला होता. मोरारजी पंतप्रधान असताना वाजपेयी भारताचे परराष्ट्र मंत्री होते. तर, लालकृष्ण अडवाणी माहिती व प्रसारण मंत्री होते”.