scorecardresearch

“हा विरोधाभास आहे, जे यांना खास वाटायचे, ते सोडून गेले आणि…” कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुनावलं!

पंजाब काँग्रेसमध्ये घडत असलेल्या राजकीय कलहाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे कान टोचले आहेत.

congress leader kapil sibal on sonia gandhi rahul gandhi
कपिल सिबल यांच्या काँग्रेस पक्षनेतृत्वाला कानपिचक्या!

गेल्या काही दिवसांमध्ये पंजाब काँग्रेसमध्ये झालेली उलथापालथ आणि त्याआधी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांनी धरलेली भाजपाची वाट या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं नेमकं काय चाललंय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. यामध्ये विरोधक आणि राजकीय विश्लेषकांसोबतच काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हे देखील आहेत. जी-२३ परिषदेच्या पहिल्या बैठकीपासून कपिल सिब्बल यांनी सातत्याने काँग्रेसमधल्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय, पक्षनेतृत्वात बदल करण्याची देखील मागणी त्यांनी सातत्याने बोलून दाखवली आहे. आता काँग्रेसमधील गोंधळाच्या ताज्या पंजाब अंकानंतर कपिल सिब्बल यांनी खोचक शब्दांत पक्षनेतृत्वाचे कान टोचले आहेत.

आम्ही त्यांच्यापैकी नाही आहोत, जे..

कपिल सिब्बल यांनी पंजाब प्रकरणानंतर एकूणच काँग्रेसमधल्या गोंधळावर बोट ठेवलं आहे. “आम्ही त्यांच्यापैकी नाही आहोत, जे पक्षाची विचारसरणी सोडून इतर पक्षांत गेले. खरंतर हा विरोधाभास आहे. जे लोक यांचे खास होते, ते तर यांना सोडून गेले. आणि ज्यांना हे खास समजत नव्हते, ते लोक आजही यांच्यासोबत आहेत”, असं कपिल सिब्बल म्हणाले.

“आम्ही जी हुजूर २३ नाहीत”

दरम्यान, पक्षातील खुशमस्कऱ्यांना देखील टोला लगावताना कपिल सिब्बल यांनी आम्ही त्यातले नाहीत, असं ठामपणे सांगितलं. “आम्ही जी हुजूर २३ नाही आहोत. हे स्पष्ट आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडू आणि मांडत राहू. आम्ही आमच्या मागण्या ठेवत राहू आणि वारंवार सांगत राहू”, असं ते म्हणाले आहेत.

पंजाबमधील परिस्थिती काँग्रेससाठी महत्त्वाची

पंजाबमध्ये निर्माण झालेल्या राजकीय कलहावर देखील कपिल सिब्बल यांनी यावेळी भाष्य केलं. “पंजाबसारख्या सीमेवरच्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत, याचा काँग्रेससाठी काय अर्थ होतो? या परिस्थितीचा आयएसआय आणि पाकिस्तानला फायदाच होणार आहे. आपल्या सगळ्यांना पंजाबचा इतिहास माहिती आहे. तिथे कट्टरतावाद उभा राहतो हे आपण पाहिलं आहे. आपण एतसंघ राहू याची काँग्रेसनं तिथे काळजी घेतली पाहिजे”, अशा शब्दांत कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुनावलं आहे.

जी-२३ हा काँग्रेसमधीलच काही ज्येष्ठ नेत्यांचा गट आहे, ज्या गटाने काँग्रेसमध्ये पक्षनेतृत्व बदल होण्याची आणि कार्यपद्धती देखील बदलण्याची मागणी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader kapil sibal targets sonia gandhi rahu gandhi g23 group pmw

ताज्या बातम्या