नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या ‘राजकीय धक्कय़ा’मुळे हडबडलेल्या काँग्रेसने गुरुवारी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ‘विरोधकांमध्ये फूट पडणे योग्य नाही. भाजपविरोधात लढायचे असेल तर एकत्र आले पाहिजे. महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय मुद्दय़ांवर काँग्रेसने नेहमीच तृणमूल काँग्रेसला सहभागी करून घेतले आहे’, अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात बुधवारी काँग्रेसच्या ‘नाकर्तेपणा’वर टीका केली. एखादा पक्ष लढायला तयार नसेल तर काय करणार, असा प्रश्न उपस्थित करत, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) महत्त्व संपुष्टात आल्याचे विधानही केले. ममता यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही राष्ट्रीय राजकारणाच्या आगामी रणनीतीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र ‘यूपीए’तील घटक पक्ष असून काँग्रेसला वगळून भाजपविरोधात आघाडी करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याची भूमिका पवार यांनी यापूर्वीच घेतली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्या ‘यूपीए’विरोधी भूमिकेमुळे काँग्रेसनेते संतप्त झाले आहेत.

‘पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला म्हणून अवघा देश ममता-ममता करणार नाही. पश्चिम बंगाल म्हणजे संपूर्ण भारत नव्हे. मोदी पाठिशी उभे राहिल्याने ममतांची ताकद वाढली आहे. आता भाजपची राजकीय परिस्थिती बिघडू लागली असून तृणमूल काँग्रेस भाजपला प्राणवायू पुरवत आहे, अशी तीव्र टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. अधीर रंजन यांच्याप्रमाणे कपिल सिब्बल यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर शरसंधान साधले. ‘यूपीए’त काँग्रेस नसेल तर या आघाडीचा आत्माच नाहीसा होईल. विरोधकांनी एकत्र लढण्याची ही वेळ आहे, हे ममता बॅनर्जी यांनी समजून घ्यावे, असे सिब्बल म्हणाले.

काँग्रेसचे नेतृत्व हा दैवी अधिकारनाही ; प्रशांत किशोर यांची राहुल गांधी यांना कोपरखळी

नवी दिल्ली : राजकारणातील काँग्रेसचे स्थान महत्त्वाचे आहे, मात्र विशेषत: गेल्या दहा वर्षांत काँग्रेस ९० टक्के निवडणुका हरलेला असताना त्या पक्षाचे नेतृत्व हा ‘कुणा एका व्यक्तीचा दैवी अधिकार’ नाही, असे सांगून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गुरुवारी राहुल गांधी यांना कोपरखळी मारली.

यापूर्वी विविध राजकीय पक्षांचे राजकीय सल्लागार राहिलेले किशोर यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व लोकशाही पद्धतीने निवडण्याचे आवाहन केले. प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘ज्या व्यक्तीबद्दल येथे चर्चा होत आहे, ती संघर्ष करण्याची आणि रा.स्व. संघापासून भारतीय लोकशाहीला वाचवण्याचे आपले दैवी कर्तव्य निभावत आहे’, असे पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्विटरवर सांगितले.

‘वैचारिक बांधिलकी नसलेला एखादा व्यावसायिक निवडणुका कशा लढवाव्या याबाबत एखाद्या पक्षाला किंवा व्यक्तींना सल्ला देण्यास मोकळा आहे, मात्र तो आमच्या राजकारणाचा अजेंडा ठरवू शकत नाही’, असे ते म्हणाले.

खेरा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्ला चढवला. ‘यूपीएचा भाग नसलेल्या एखाद्या नेत्याने यूपीए अस्तित्वात नसल्याचा दावा करणे ही विचित्र गोष्ट आहे. मी अमेरिकेचा नागरिक नाही, याचा अर्थ अमेरिका अस्तित्वात नाही असा नव्हे’, असाही टोला त्यांनी हाणला. काँग्रेस हा प्रमुख राष्ट्रीय विरोधी पक्ष असून, सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांसाठी तो मध्यवर्ती आधारस्तंभ आहे, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले.

काँग्रेस-तृणमूलमध्ये बेबनाव

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेस व तृणमूल काँग्रेस स्वतंत्रपणे भाजपविरोधात लढत आहेत. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते अनुपस्थित राहिले. राज्यसभेतील खासदारांचे निलंबन असो वा महागाई वा अन्य मुद्दय़ांवर काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांनी सभात्याग केला. पण, काँग्रेसचे सदस्य आधी सभागृहाबाहेर पडले, नंतर तृणमूल काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांच्यातील दुफळीचे चित्र गेल्या चार दिवसांमध्ये संसदेत पाहायला मिळाले.