काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर टीका केली आहे. आपल्या पुस्तकात मनीष तिवारी यांनी लिहिलं आहे की २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. कोणतीही कारवाई न करणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, असंही त्यांनी लिहिलं आहे.

मनीष तिवारी आपल्या पुस्तकात म्हणतात, जेव्हा एखादा देश(पाकिस्तान) निर्दोष लोकांची कत्तल करतो आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा खेद व्यक्त करत नाही. त्यावेळी संयम दाखवणं ही ताकद नसून कमकुवतपणाचं लक्षण आहे. २६/११ च्या वेळी एक अशी संधी होती की जेव्हा शब्दांपेक्षा प्रत्युत्तर देत कारवाई करणं गरजेचं होतं. तिवारी यांनी या मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ च्या हल्ल्याशी करत भारताने कठोर कारवाई करायला हवी होती, असं मत व्यक्त केलं होतं.

याआधीही मनीष तिवारी यांनी पक्षावर टीका केली होती. या आधी पंजाबमधल्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करत ते म्हणाले होते की, ज्यांना पंजाबची जबाबदारी दिली होती, त्यांना त्याची अजिबात जाणीव नाही. यासोबतच तिवारी यांनी कन्हैय्या कुमारच्या पक्षप्रवेशावरही प्रश्न उपस्थित केला होता.
मनीष तिवारी यांच्या पुस्तकातल्या या उल्लेखावरुन आता भाजपानेही काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

भाजपा प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की मनीष तिवारी यांनी केलेली टीका योग्य आहे. त्यांनी लिहिलं आहे की एअर चीफ मार्शल फली मेजर यांनीही सांगितलं होतं की, या हल्ल्यानंतर वायूसेनेला कारवाई करण्याची इच्छा होती मात्र तत्कालीन सरकारने कारवाई करण्यास मनाई केली. पूनावाला यांनी असाही आरोप केला आहे की, काँग्रेस त्यावेळी या मुंबईत झालेल्या हल्ल्यासाठी हिंदूंना जबाबदार ठरवलं आणि पाकिस्तानचा बचाव करण्यात व्यस्त झाले.