मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे आज(सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

काल (रविवार) त्यांचा जन्मदिवस देखील  होता. दोन दिवस अगोदर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अगोदर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले होते. तेव्हा त्यांच्यावर दिल्लीतली एम्स रुग्णालयात उपचार झाले व ते करोनावर मात करून घरी परतले होते.

मोतीलाल वोरा यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील बनवण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधानाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे ते अतिशय खास व्यक्ती मानले जात होते. राजकारणात येण्या अगोदर त्यांनी पत्रकारिता केली होती.