Priyanka Gandhi student Protest Lathicharge updates: काँग्रेसच्या नेत्या, खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी बुधवारी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर बळाचा वापर करण्यात आला, लाठीचार्जसह पेलेट गन चालवली गेली, बिहारमध्ये एके४७ वापरण्यात आली, या सर्वांची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह घेणार की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलत असताना त्यांनी म्हटले की, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यावर बळाचा वापर करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? हे देशासमोर यायला हवे. विरोधकांनी ही मागणी संसदेत केली असेल तर त्यात गैर काय? लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जर प्रश्न विचारले असतील तर त्याचे उत्तर संसदेत दिले जाणे गरजेचे होते, असे त्या म्हणाल्या.

प्रियांका गांधी वाड्रा पुढे म्हणाल्या, देशभरात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. विविध राज्यात आंदोलन पार पडत आहे. दिल्लीतील आंदोलनात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, पेलेट गन्स चालविण्यात आली. तसेच बिहारच्या पटनामधील आंदोलनात एके ४७ चालविण्यात आली. या सर्व घडामोडींवर भाष्य करणे सरकारला उचित वाटत नाही का?

माध्यमांवर संतापल्या

विरोधक अधिवेशन का चालवू देत नाहीत, असा प्रश्न माध्यमांनी यावेळी प्रियांका गांधी वाड्रा यांना विचारला. त्यानंतर त्या चांगल्याच संतापल्या, आम्हीदेखील माध्यमांसारखे शांत बसायचे का? विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार होत असताना आम्ही शांत बसणार नाही, असे त्यांनी माध्यमांना सुनावले.

अमित शाह उद्या लोकसभेत बोलणार

२० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. तेव्हापासून संसदेचे अधिवेशन सुरळीत चालू शकलेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी हे सभागृहातही आलेले नाहीत. बुधवारी अमित शाह यांनी यावर मौन तोडले. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटले, “आज दुपारी विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांना दुपारी २ वाजेपर्यंत पत्र द्यावे. आज ३ वाजल्यापासून ते उद्या ३ वाजेपर्यंत आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मी स्वतः यावेळी बसेल आणि चर्चेला उत्तर देईल.”

“आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. तुम्ही चर्चेला का तयार नव्हता, याचीदेखील आम्ही चर्चा करू. भाजपा आणि एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकार प्रत्येक उत्तर देण्यासाठी तयार आहे. फक्त त्यांनी सभागृह चालू द्यावे. आज मी माध्यमांच्या माध्यमातून दुपारी २ वाजेपर्यंत पत्र द्यावे, म्हणजे आपण चर्चा सुरू करू. उद्या मी ३ वाजेपर्यंत त्याला उत्तर देईल”, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.