scorecardresearch

“आत्मपरीक्षण करा”, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाले “पक्षाचा अध्यक्ष…”

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरील व्यक्ती सर्वमान्य असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

“आत्मपरीक्षण करा”, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाले “पक्षाचा अध्यक्ष…”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावं, असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसचा अध्यक्ष कळसूत्री बाहुली नसावा. या पदावरील व्यक्ती सर्वमान्य असावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्षांवर चव्हाण यांनी अप्रत्यक्ष निशाणा देखील साधला आहे.

आझाद यांचा राजीनामा अत्यंत दुर्दैवी! पत्राची वेळ आणि निष्कर्ष चुकीचा, राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, राजीनाम्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं वृत इंडिया टुडेनं दिलं आहे. १६ ऑगस्टला आझाद यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

“राहुल गांधींची अपरिपक्वता, बालिशपणा…,” राजीनामा पत्रात गुलाम नबी आझाद यांचे गंभीर आरोप; जाणून घ्या सहा महत्त्वाचे मुद्दे

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आझाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात खासदार राहुल गांधीवर आझाद यांनी गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे त्यांच्या अपरिपक्वतेचं उदाहरण असल्याचा हल्लाबोल आझाद यांनी या पत्रात केला आहे. दरम्यान, आझाद यांच्या या आरोपांचं काँग्रेसकडून खंडण करण्यात आलं आहे. आझाद यांच्या पत्राची वेळ आणि त्यातील निष्कर्ष चुकीचा आहे, असं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader pruthviraj chavan advice self assessment to congress party after gulam nabi azad resignation rvs